29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया!
Murlidhar Mohol Undergoes Surgery : पुण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नुकतीच पुण्यातील एका खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या जुन्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक ठरली. या उपचारानंतर मुरलीधर मोहोळ यांना किमान एक महिना सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असून, त्यामुळे त्यांच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना काही काळ स्थगिती मिळाली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे या दुखापतीचा इतिहास सांगितला. २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळत असताना त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. या एका दुखापतीमुळे त्यांना कुस्तीचे आपले स्वप्न अर्धवट सोडावे लागले. गेली अनेक वर्षे त्यांनी या त्रासाकडे दुर्लक्ष केले; मात्र सार्वजनिक जीवनातील सततचा प्रवास आणि धावपळ यामुळे हा त्रास असह्य बनला. अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्याय असल्याचे सांगितले.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून, मतदारसंघातही विकासकामे आणि भेटीगाठींचे मोठे नियोजन होते. अशा महत्त्वाच्या काळात विश्रांती घ्यावी लागत असल्याने मोहोळ थोडे भावूक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्यापक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्यात त्यांनी जनसेवेतील खंड आणि दुखापतीच्या पार्श्वभूमीवरची आपली मनःस्थिती स्पष्ट केली.
क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 14, 2026
२९ वर्षांपूर्वी... कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली... इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे… pic.twitter.com/VX7a6VAMDR
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
मुरलीधर मोहोळ आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले, "क्षमस्व... पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती! २९ वर्षांपूर्वी... कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली... इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती! खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे... आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा... या सगळ्याचं काय? दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने..."
शस्त्रक्रियेनंतर मुरलीधर मोहोळ पुढील 7 ते 8 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच राहणार आहेत. त्यानंतर त्यांना घरी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या आत्मविश्वासातून, लवकरच बरे होऊन पहिल्यापेक्षा जास्त जोमाने जनसेवेत परत येण्याचा त्यांचा संकल्प दिसून येतो, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी नमूद केले.












Click it and Unblock the Notifications