काय चाललयं महाराष्ट्रात! मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’ ऑडीने रिक्षाला चिरडलं
मुंबई : महाराष्ट्रात हिट अँड रनची मालिका संपता संपत नसून मुंबईतील जुहू-वरळीत झालेल्या हिट अँड रनला महिनाही उलटत नसतानाच आता पुन्हा मुलुंडमध्ये एका ऑडी कारने रिक्षाला चिरडलं. त्यानंतर कारचालक पसार झाला आहे. ही घटना आज सकाळी घडल्याचे सुत्रांनी सांगितलं.
पुणे, नागपूर, मुंबईत काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणानं संपूर्ण देश हादरलेला. अशातच आता पुन्हा एकदा आणखी एका हिट अँड रन प्रकरण मुंबईत घडलं असून ही घटना मुंबईतील मुलुंडमध्ये घडली. यासंदर्भात एबीपी माझानं वृत्त दिलं आहे.

काय आहे प्रकार?
एका ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे. यामध्ये चालक आणि प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातानंतर ऑडी चालकानं घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती मिळत आहे.
कारचालकाचा शोध
मुलुंडमध्ये आज सकाळी हिट अँड रनची घटना घडली. यामध्ये भरधाव ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली. मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, चालकाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अपघातात प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.
वरळी हिट अँड रन कसं झालं होतं?
शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या भरधाव बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीवरुन जाणाऱ्या नाखवा दाम्पत्याला उडवलं होतं. या अपघातात महिलेला काही अंतर फरफटत नेल्यानंतर तिच्या अंगावरुन कार गेली. या दुर्दैवी अपघातात ती महिला ठार झाली होती. मृत महिला आणि तिचा पती पहाटेच मासळी बाजारात लिलावासाठी जात होते.
पुणे, नागपूर, पिंपरीतही याआधी घटना
पोर्शे कार अपघातात दोन जणांना एका अल्पवयीन मुलाने चिरडलं होते. यात दोघांचा मृत्यू झाला होता. कल्याणीनगर इथे हा अपघात झाला होता. त्यानंतर नागपूरातही एका धनाड्य महिलेच्या कारखाली चिरडून जीव गेला होता. या घटना घडल्यानंतर वरळी आणि आता पुन्हा मुलुंडमध्ये घटना घडली आहे. या घटना थांबता थांबत नसून गतीविषयक कठोर नियमांची गरज आहे.












Click it and Unblock the Notifications