MPSCची मोठी बातमी : 21 डिसेंबरची गट-ब पूर्वपरीक्षा अखेर लांबणीवर; आता या तारखेला होणार एक्झाम!
MPSC Group B Exam Pospond 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे २१ डिसेंबर २०२५ रोजी होणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता नववर्षाच्या पहिल्या रविवारी म्हणजेच ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी परीक्षा आयोजित करण्याच्या अडचणींमुळे आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

मतमोजणीचा फटका आणि संभ्रमावस्था
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट-ब पूर्वपरीक्षेची संपूर्ण जबाबदारी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी व महसूल विभागाकडे असते. मात्र, २१ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व इतर महत्त्वाचे अधिकारी मतमोजणीच्या कामात व्यस्त राहणार होते. यामुळे परीक्षा होणार की नाही, याबद्दल उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सोमवारी एका परिपत्रकाद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याची अधिकृत घोषणा केली.
आयोगाने काय म्हटले?
आयोगाने आपल्या परिपत्रकात परीक्षा पुढे ढकलण्याची कारणे स्पष्ट केली आहेत:
राज्य निवडणूक आयोगाचा आदेश : राज्य निवडणूक आयोगाच्या २ डिसेंबर २०२५ च्या आदेशानुसार २१ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अडचणी: मतमोजणी आणि परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने आयोगाने जिल्हा केंद्रांकडून माहिती मागवली होती. या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा आयोजित करण्यात खालील अडचणी व्यक्त केल्या:
- परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यातील कमी अंतर.
- मतमोजणी दरम्यान होणारा लाऊडस्पीकरचा आवाज.
- वाहतूक कोंडी.
- विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांमुळे होणारा अडथळा.
- परीक्षेच्या आयोजनासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता.
- सदर वस्तुस्थिती विचारात घेऊन आयोगाने परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
MPSC च्या नवीन परीक्षा तारखा
- परीक्षेचे नाव : जुनी तारीख : नवीन तारीख
- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) : सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा - २०२५ : २१ डिसेंबर २०२५ : ०४ जानेवारी २०२६
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा - २०२५- ११ जानेवारी २०२६ -
गट-ब परीक्षेची महत्त्वपूर्ण माहिती!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलीस उपनिरीक्षक (PSI), राज्य कर निरीक्षक (STI) आणि सहायक कक्ष अधिकारी (ASO) या पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते.
- पदांची संख्या: यंदा एकूण ६७४ पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.
- पदांचे तपशील:
- पोलीस उपनिरीक्षक (PSI): ३९२ पदे
- राज्य कर निरीक्षक (STI): २७९ पदे
- सहायक कक्ष अधिकारी (ASO): ०३ पदे
दोन वेळा तारीख बदलली!
मूळात संयुक्त पूर्व गट-ब 2025 (अराजपत्रित) परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी होणार होती. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागात आलेल्या पूर परिस्थितीमुळे ती परीक्षा 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आणि आता मतमोजणीमुळे ती पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications