महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ऐतिहासिक निर्णय; 850 उद्योग आता 'पांढऱ्या श्रेणी'त समाविष्ट
Mpcb historic decision 850 industries included in white category : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) राज्यातील ८५० औद्योगिक आस्थापनांचा समावेश 'पांढऱ्या श्रेणीत' (White Category) करून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राज्य शासनाच्या 'इज ऑफ डुईंग बिझनेस' धोरणांतर्गत उद्योगांसाठी पर्यावरणस्नेही वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष श्री. सिद्धेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि सदस्य सचिव श्री. एम. देवेंदर सिंह (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्योगांचे वर्गीकरण लाल, नारिंगी, हिरव्या, निळ्या आणि पांढऱ्या श्रेणीत केले जाते. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय मंडळाने पांढऱ्या श्रेणीत केवळ ५४ उद्योगांचा समावेश केला होता. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही व्याप्ती वाढवून सुरुवातीला २२२ आणि आता थेट ८५० उद्योगांपर्यंत नेली आहे. इतक्या मोठ्या संख्येने उद्योगांना पांढऱ्या श्रेणीत स्थान देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
या निर्णयामुळे गृह उद्योग, कुटीर उद्योग आणि लघु उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. या श्रेणीतील उद्योगांना आता केवळ एका पानाचा ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल आणि त्यांना तात्काळ परवानगी दिली जाईल. विशेष म्हणजे, या उद्योगांकडून कोणतेही पर्यावरणीय शुल्क आकारले जाणार नाही. यामध्ये प्रामुख्याने हाताने दागिने तयार करणे, पर्यावरणस्नेही अगरबत्ती आणि धूप निर्मिती, संगणक जुळणी, टीव्ही व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जुळणी, बुक बाइंडिंग, सिमेंट पाईप निर्मिती, केमिकल प्रक्रिया विरहित चर्मोद्योग, पापड उद्योग, फ्लोअर मिल, मसाला उद्योग आणि सुकी मासळी प्रक्रिया केंद्र अशा अनेक व्यवसायांचा समावेश आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी व्यक्त केला आहे. तर, सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह यांनी नमूद केले की, उद्योगांना परवानगीसाठी आता दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. एका अर्जावर कायमस्वरूपी अनुमती मिळणार असल्याने राज्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. महाराष्ट्राच्या या पर्यावरणस्नेही पुढाकाराचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेही कौतुक केले आहे.












Click it and Unblock the Notifications