मीरा-भाईंदर मोर्चापूर्वी मनसेचे अविनाश जाधव पहाटेच ताब्यात; पोलीस कारवाईमुळे तणाव
मीरा-भाईंदर शहरात मराठी जनतेवरील अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज (मंगळवार, 9 जुलै) मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र, मोर्चा सुरू होण्यापूर्वीच ठाणे-पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. सध्या त्यांना काशीमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

मोर्च्याला पोलिसांची परवानगी नाकारली, कारवाईत वेग
मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी घेतलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर, मराठी समाजाच्या भावनांचा उद्रेक रोखण्यासाठी मनसेने प्रत्युत्तरादाखल मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला आधीच परवानगी नाकारली होती. याच पार्श्वभूमीवर मनसे व ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात येत होत्या.
अविनाश जाधव यांनी पोलिस नोटीसकडे दुर्लक्ष करून मोर्चा नियोजित वेळेत निघणार असल्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी पहाटेच त्यांच्या निवासस्थानी छापा मारून त्यांना ताब्यात घेतले.
इतर मनसे पदाधिकाऱ्यांवरही कारवाई सुरू
फक्त जाधवच नव्हे, तर वसई-विरारमधील इतर मनसे पदाधिकाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मोर्चा होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आजचा मोर्चा सकाळी 10:00 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होऊन मिरा रोड स्टेशन परिसरात संपणार होता.
जाधव यांचा आरोप: "पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत"
मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. "मराठी आमची आई आहे, तिच्यासाठी कोणतीही किंमत मोजायला आम्ही तयार आहोत," असे जाधव म्हणाले होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत आरोप केला की, पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला असून, मराठी जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे.
मोर्चा कशासाठी?
मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. काही प्रकरणांमध्ये मराठी व्यक्तींना घर न देणे, विशिष्ट समाजाच्या नावाने तणाव निर्माण करणे आणि स्थानिक भाषेला बाजूला सारल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मराठी संघटनांनी एकत्र येत निषेधाचा आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला होता.












Click it and Unblock the Notifications