मोठी बातमी: अजित पवार- संदीप क्षीरसागरांच्या भेटीचं कारण आलं समोर; शरद पवारांचे टेंन्शन वाढणार?
गेल्या काही महिन्यांपासून बीडच्या राजकारणात रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. अगोदर शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर तर रोज पक्षांतराचे प्रकार घडताना दिसत आहेत. सध्या शिवसेने शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजकीय हालचालीही वाढल्या आहेत. आज राजकारणात पुन्हा एका बातमीची चर्चा सुरु झाली. बातमी होती बीड जिल्ह्यातली. शरद पवार गटाच्या एका आमदाराने उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आले.

कुणी घेतली दादांची भेट?
बीडमधील शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. जुन्नर बाजार समितीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीची कल्पना इतरांना नव्हती, असेही सांगितले जात आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कोण आहेत क्षीरसागर?
आ. संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांना साथ दिली. विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर हे विजयी झाले. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर हे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. विधीमंडळात आणि विविध मोर्चांमध्ये संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला होता. मात्र आता त्यांनीच अजित पवारांची भेट घेतल्याने चर्चा वाढल्या आहेत.
काय म्हणाले अजितदादा?
या भेटीबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारल्यावर ते चांगलेच भडकले. ते म्हणाले, तुम्ही वेडे आहात का? मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. बीडचा पालकमंत्री आहे. ते विरोधी पक्षात असले तरी, त्यांच्या शहराला २१ दिवसांपासून पाणी नाही. ते सांगायला ते आले होते. बीडचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या भेटीत राजकीय काहीच बोलणं झालं नाही. फक्त पाणी प्रश्नावर आम्ही बोललो. दुसरीकडे आ. संदीप क्षीरसागर यांनीही, भेटीचं हेच कारण सांगितलं.












Click it and Unblock the Notifications