'पठारे'शाहीला माऊली कटकेंचं 'धारदार' आव्हान, कटकेंनी सगळचं काढलं; व्हिडिओ व्हायरल
Pune Mahapalika Election | पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा आता खऱ्या अर्थाने उडू लागला आहे. प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मध्ये चुरस इतकी वाढली आहे की, आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन राजकीय अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे (Mla Bapu Pathare) यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे (Surendra Pathare) आणि सून ऐश्वर्या पठारे (Aishwarya Pathare) एकाच वेळी रिंगणात उतरल्याने 'घराणेशाही'च्या मुद्यावरून त्यांच्यावर टीका होत असतानाच, आमदार माऊली कटके यांनी केलेल्या टोकदार टीकेने खळबळ उडवून दिली आहे.

"पैसा म्हणजे सर्वस्व नाही!" कटकेंचा घणाघात
आमदार माऊली कटके यांनी पठारे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत थेट हल्ला चढवला आहे. "आमच्याकडे पैसा आहे म्हणजे आम्ही काहीही करू शकतो, असा जो भ्रम पठारे परिवाराला झाला आहे, तो जनताच उतरवेल," अशा कडक शब्दांत कटकेंनी समाचार घेतला. एकाच घरात तीन-तीन तिकिटे खेचून आणल्याने सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.
कटके यांनी उपस्थित केलेले 'जळजळीत' प्रश्न
- सोयीचं राजकारण: दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत असलेले सुरेंद्र पठारे आज भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ही सोयीची भूमिका असल्याचे म्हणत कटकेंनी सडकून टीका केली.
- आमदार बापू पठारे 'नॉट रिचेबल'?: "युतीचे आमदार म्हणून बापू पठारे नक्की आहेत कुठे? ते जनतेसमोर का येत नाहीत?" असा सवाल कटकेंनी विचारला आहे. "अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र असताना बापू पठारे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी जनतेला सांगावे की नेमके मतदान कुणाला करायचे? असे कटके म्हणाले.
- टँकरवरून आरोप: सर्वात खळबळजनक आरोप करताना कटके म्हणाले की, आधी पाणी यांच्या विहिरीत येते आणि मग टँकरने लोकांपर्यंत पोहोचते. या माध्यमातून पैसै कमावले जात असल्याचा गंभीर आरोप कटके यांनी केला.
लोकांच्या भावनांशी खेळ थांबवा!
"आम्ही इकडेही लढू आणि तिकडेही लढू, असा त्यांचा जो अहंकार आहे, तो लोकशाहीला घातक आहे. जनतेच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही," असे म्हणत कटकेंनी 'परिवारवादा' विरोधात बिगुल फुंकले आहे.
निवडणुकीचे समीकरण बदलणार?
एकीकडे पठारे परिवाराने आपली पूर्ण ताकद झोकून दिली असताना, माऊली कटके यांनी थेट 'पैसा विरुद्ध जनता' आणि 'घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता' असा नरेटिव्ह सेट केला आहे. पठारे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आता वॉर्डातील जनमानसात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.
आता या प्रहाराला पठारे कुटुंब काय उत्तर देते आणि प्रभाग ३ व ४ मधील जनता 'घराणेशाही'च्या आरोपांवर कशाप्रकारे उत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications