म्हाडाच्या 3 हजार 362 सदनिकांसाठी थोड्याच वेळाच सोडत, सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार
MHADA Pune Lottery : पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 3 हजार 362 सदनिकांसाठी बुधवारी (29 जानेवारी) सोडतीला काही वेळातच सुरुवात होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डाॅ. पंकज भोयर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाईल. यावेळी म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची देखील उपस्थित राहणार आहेत.
ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात अर्जदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे.

या ठिकाणच्या सदनिकांचा आहे समावेश
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सदनिकांसाठी 10 ऑक्टोबर 2024 रोजी शुभारंभ करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण 6 हजार 420 सदनिकांचा समावेश होता.
त्यापैकी 2 हजार 758 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेच्या, पंढरपूर येथील म्हाडा योजनेच्या 28 सदनिका, पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या 65 आणि वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील 3 हजार 569 सदनिकांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सदनिकांसाठी अर्ज करण्यास दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
93 हजार अर्ज झाले प्राप्त
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेमधील 2 हजार 758 सदनिकांसाठी 1 हजार 375 अर्ज प्राप्त झाले असून सोडतीसाठीच्या उर्वरीत 3 हजार 662 सदनिकांसाठी एकूण 93 हजार 662 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 71 हजार 642 अर्जदारांनी अनामत रकमेचा (डिपाॅझिट) भरणा केला असून त्यांचा सोडतमीमध्ये समावेश करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications