कुणाला लागणार म्हाडाच्या घराची लाॅटरी! CM शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील 2030 सदनिकांची आज सोडत
Mhada Lottery : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या 2 हजार 30 सदनिकांच्या विक्रीसाठी अनामत रकमेसह प्राप्त 1 लाख 13 हजार 811 पात्र अर्जांची संगणकीय सोडत आज सकाळी वाजता साडेदहा वाजता नरिमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणाऱ्या या सोडतीला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. तसंच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा यासाठी सभागृहाच्या आवारात आणि सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.
अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचं घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा म्हाडाच्या @mhadaofficial या युट्यूब चॅनल आणि फेसबूक पेजवरून करण्यात येणार आहे.
वेबकास्टिंगची लिंक म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर आणि समाजमाध्यम व्यासपीठांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.












Click it and Unblock the Notifications