मराठवाड्यात राजकीय भूकंप! महायुती, महाविकास आघाडीचे गणित बिघडले; संभाजीनगरमध्ये युती फिस्कटली!'
Marathwada municipal election mahayuti mva alliance break : आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी मराठवाड्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रयोग यशस्वी होत असताना, मराठवाड्यात मात्र स्थानिक पातळीवर हे दोन्ही मोठे गट विखुरले गेल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडली आहे, तर नांदेडमध्ये भाजपने 'एकला चलो रे'ची भूमिका घेत स्वबळावर अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे, परभणीत राज्यातले कट्टर विरोधक असणारे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले असून, तिथे एक वेगळाच 'पॅटर्न' पाहायला मिळत आहे.

विभागनिहाय राजकीय स्थिती
१. छत्रपती संभाजीनगर: महायुती फिस्कटली!
छत्रपती संभाजीनगर येथे जागावाटपावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये प्रचंड ओढाताण झाली. भाजप अपेक्षित जागा सोडत नसल्याने शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. दरम्यान, सन्मानजनक जागा मिळत नसल्याचा आरोप करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे.
२. नांदेड: अशोक चव्हाणांची पहिली 'अग्निपरीक्षा'
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच महापालिका निवडणूक आहे. भाजपने येथे कोणत्याही मित्रपक्षाला सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत देत सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
३. परभणी: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
परभणीत राज्याच्या राजकारणापेक्षा वेगळे चित्र आहे. येथे महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहे, तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन तिसरी आघाडी उभी केली आहे. येथे काँग्रेस आणि उद्धवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत.
४. लातूर आणि जालना: गोंधळाचे वातावरण
- लातूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) तिन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीत आहेत.
- जालना येथेही महायुतीमध्ये राष्ट्रवादीला डावलले जात असल्याची भावना निर्माण झाल्याने पक्षाने स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे.
कळीचे मुद्दे
एबी फॉर्मचा पेच कायम
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेत्यांना 'एबी फॉर्म' (AB Form) साठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
बंडखोरीची भीती सर्वांनाच
युती फिसकटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजप-शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता असून, याचा फायदा कोणाला होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
स्थानिक विरुद्ध वरिष्ठ
वरिष्ठ पातळीवर युती असली तरी स्थानिक कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघावर दावा ठोकल्याने पेच वाढला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण वरचढ ठरते आणि कुणाच्या पारड्यात मायबाप जनता काय टाकते हे पाहणे महत्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications