मनोज जरांगें यांची आजपासून शांतता रॅली, 'हे' आमदार पाडण्याचा दिला इशारा
मुंबई- खासदार अशोक चव्हाण व खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवली सराटीत जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. अंतरवलीतल्या सरपंचांच्या घरी ही भेट झाली. चव्हाण व मनोज जरांगे यांच्यात दोन तास चर्चा झाली. सोमवारपासून शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे.

या दौऱ्यामध्ये शिंदे समिती मनोज जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटच्या मागणीबाबत पुरावे गोळा करणार आहे. जरांगेंना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जाते.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी लढा उभा केला आहे. मनोज जरांगेंनी जून महिन्यात उपोषणही सुरु केलं होतं. मात्र त्यावेळी शंभूराज देसाई यांनी त्यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. आता मनोज जरांगेंनी सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह आरक्षणासाठी 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. जरांगे हे आजपासून शांतता रॅली सुरु करणार आहेत. त्याआधीच सरकारच्या हालचाली दिसून आल्या. त्यामुळेच अशोक चव्हाण हे मनोज जरांगेच्या भेटीला आले.
13 जुलैपर्यंत सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही, तर आम्ही उपोषण वगैरे करणार नाही. विधानसभा निवडणुकीत नावं घेऊन उमेदवार पाडू, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. आता अशोक चव्हाणांची शिष्टाई यशस्वी होईल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
भेटीनंतर जरांगे काय म्हणाले?
अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून सरकारसोबत चर्चा सुरु राहिल. काहीही झाले तरी आमच्या मागण्यांबाबत पाठपुरावा सुरुच ठेवणार आहोत. सगेसोयऱ्यांच्या आमच्या व्याख्येप्रमाणे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेण्यात यावा. तसंच मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी ही चर्चा झाली, असं मनोज जरांगेंनी सांगितलं.
भेटीनंतर चव्हाण काय म्हणाले?
हा विषय जेवढ्या लवकर संपेल तेवढा बरा, अशी आमचा सर्वांची इच्छा आहे. आमच्या चर्चेत राजकीय विषय नव्हता. शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून, हा विषय लवकर संपवा अशी आमची भावना आहे. हा संवाद होण्याच्या कारणाने आपण आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
शिंदे समिती जाणार हैदराबादला
सोमवारपासून शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. शिंदे समितीचा हा चार दिवसांचा हैदराबाद दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिंदे समिती मनोज जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटच्या मागणीबाबत पुरावे गोळा करणार आहे. या कामात मदत करावी अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवांना पत्र देऊन केली आहे. दुसरीकडे जरांगे आजपासून दौराही सुरु करणार आहेत.












Click it and Unblock the Notifications