मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याबरोबर आमरण सामुहिक उपोषण... जरांगे पाटील कडाडले
नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी गुरुवारी पार पडला. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्ममंत्रीपदाची शपथ घेतली. आता या शपथविधी सोहळ्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा डरकाळी फोडली आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सामुहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

नव्या सरकारचं केलं अभिनंदन
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी नव्या मंत्रिमंडळाला शुभेच्छ दिल्या. ते म्हणाले, कायद्याप्रमाणे त्यांनी शपथ घेतली. याबद्दल तिन्ही नेत्यांचे अभिनंदन. सगळ्या नेत्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र आता मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा आहे. नाटकबाजी आता बंद झाली पाहिजे. आम्हाला हक्काचं मिळालं पाहीजे, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
फडणवीसांबाबत काय म्हणाले जरांगे..?
नव्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याचं पत्रकारांनी जरांगे यांना सांगितलं. त्याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, असं ते म्हणाले असतील तर चांगली गोष्ट आहे. असं झालं तर लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील. सगळा समाज त्यांचे अभिनंदन करेल.
काय दिला जरांगे पाटलांनी इशारा..?
जरांगे पाटील यांनी आपली आगामी रणनीतीही सांगितली. ते म्हणाले, नव्या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र आता नाटकबाजी बंद करुन आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला जावा. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर आम्ही सामुहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करु, असा इशाराही त्यांनी दिला. आपण उपोषणावर ठाम असल्याचंही जरांगे पाटलांनी पुन्हा सांगितलं.
ओबीसीमधून आरक्षणावर ठाम
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण दिलं होतं. मात्र त्या आरक्षणाला जरांगे पाटील यांचा विरोध होता. आपल्याला ओबीसीमधूनच आरक्षण हवंय, या हट्टावर जरांगे पाटील ठाम आहेत. ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठीच आपण पुन्हा आंदोलन करणार असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं.












Click it and Unblock the Notifications