कृषिमंत्र्यांना 'जंगली रमी'चा नाद; स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटेंची धांदल, म्हणाले- मी पाप...
Manikrao Kokate statement on viral rummy video : महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मंत्रिपद मिळाल्यापासूनच विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा ते एका नव्या वादात सापडले. थेट विधीमंडळाच्या सभागृहात मोबाईलवर 'जंगली रमी' गेम खेळतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर कोकाटे यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठली, अखेर कोकाटे यांना या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना चांगलाच दमछाक बसला.
आधी संपूर्ण प्रकरण जाणून घ्या?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर जंगली रमीचा गेम खेळताना दिसत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांनी कोकाटे यांना चांगलेच घेरले आहे.

कोकाटे म्हणतात- मी काही पाप केलं नाही!
या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांनी आपला बचाव केला. ते म्हणाले, मी वरिष्ठ सभागृहात बसलो असताना कनिष्ठ सभागृहात काय चाललंय हे पाहण्यासाठी यूट्यूब प्ले करत होतो.
मात्र, यूट्यूब प्ले करत असतानाच एक जाहिरात (अॅड) आली. ती जाहिरात स्किप (Skip) करताना मला दोन-तीन सेकंद लागले."
कोकाटे यांनी उलट प्रश्न विचारत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला, "तुम्हाला तशी जंगली रमीची जाहिरात येत नाही का?" ते पुढे म्हणाले, "मी काही पाप केलं नाही. मी जाहिराती स्किप करत होतो, त्यामध्ये दोन-तीन सेकंद लागले.
ते त्यांना दाखवायचं नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामावरती ते बोलत नाहीत. माझं काम पारदर्शक असल्याने मी कशाला अशा पद्धतीने गेम खेळत बसू, असं म्हणत त्यांनी सारवासारव केली.
"माझ्या काही लक्षात आलं नाही. दुसऱ्या सेकंदाला मी जाहिरात स्कीप केली. मात्र, तेवढाच व्हिडिओ दाखवून मला टार्गेट करण्यात आल्याचं" कोकाटे यांनी म्हटलं आहे.
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही पलटवार!
विरोधकांच्या आरोपांवरून कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही पलटवार केला. ते म्हणाले, "आम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही का? त्यासाठी आम्ही दौरे करत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहोत. मात्र, लोकांना बदनाम करण्यासाठी हा डाव असल्याचं कोकाटे म्हणाले.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही विशेष नाही, असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा प्रश्न केला, "तुम्हाला जंगली रमीची जाहिरात येत नाही का? रोहित पवारच्या मोबाईलमध्येही अशा जाहिराती येतात. मात्र ते स्वतःची करमणूक करून घेत आहेत."
भाजप आणि मंत्रिपदाच्या चर्चेवर कोकाटे!
भाजपला विचारून काम करावं लागतं, या टीकेवर कोकाटे म्हणाले की, "कारण नसताना टार्गेट केलं जात आहे. मी आता कोणत्याही प्रकारचे विधान केलेले नाही. माझ्या विभागासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. या गोष्टीला एवढं महत्त्व का द्यावं?" असा सवालही त्यांनी माध्यमांना केला. "मीडिया इतकं डोक्यावर का घेत आहेत?" असंही ते म्हणाले.
मंत्र्यांना डच्चू, मग संजय राऊतांनाच माहिती असावी!
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चार मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचेही नाव असल्याचं राऊत म्हणाले होते. या संदर्भात विचारलं असता, कोकाटे म्हणाले, "ते संजय राऊतला माहित असेल, मला काय माहित नाही." एकंदरीत, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा 'रमी' व्हिडिओ वाद येत्या काळात आणखी रंगण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications