'माहिम'वरुन मनसेचा मुख्यमंत्री शिंदेवर थेट हल्ला; संकुचित नेता म्हणत थेट...
मुंबईतला माहिम मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्या उपकाराची पतरफेड म्हणून महायुतीने या मतदारसंघात उमेदवार उभा करु नये, अशी चर्चा होती. मात्र शिंदे गटाचे माहिमचे विद्यमान आ. सदा सरवणकरही निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याने या मतदारसंघात आता पेच वाढला आहे. मनसेने आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ करताना ठाकरे गटासह एकनाथ शिंदे यांच्यावरही तोफ डागली.

सदा सरवरणकरांशी चर्चा निष्फळ
या मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सदा सरवणकर यांच्यासोबत शुक्रवारी झालेली दोन तासांची चर्चा निष्फळ ठरली. ते निवडणूक लढण्यावर ठामच आहेत. त्यामुळे आता मनसेने शिंदे गटालाही लक्ष केले आहे.
माहिमचा वाद आणखी वाढला
या मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, माहीममधून आमचे गेल्या 3 ते 4 टर्म पासून आमदार आहेत. त्या आमदारांशी व तेथील कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली. मात्र तेथील कार्यकर्ते आक्रमक आहेत. निवडणूक लढायचीच या भूमिकेवर ते ठाम आहेत. आम्हाला कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावं लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची पहिली तोफ डागण्यात आली.
मुख्यमंत्र्यावर मनसेकडून जोरदार हल्ला
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदे किंवा महायुतीकडे गेलेलो नाही. मात्र, आम्ही ज्या पद्धतीने लोकसभेला पाठिंबा दिला, त्याची परतफेड म्हणून या लोकांनी विचार करायला हवा होता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संकुचित विचारांचे आहेत, हे यावरून सिद्ध झाले अशी टीका किल्लेदार यांनी केली.












Click it and Unblock the Notifications