Maharashtra Rain राज्यात पावसाचा मोठा दिलासा; पण या भागात जोरदार पाऊस होणार! 8 जिल्ह्याना येलो अलर्ट
Maharashtra Rain Yellow Alert for Mumbai Pune : राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोसळत असलेला पाऊस थोडी उसंत घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुरस्थिती आणि पाऊस ओसरणार आहे. हा दिलासा खासकरुन विदर्भ,मराठवाडा आणि मुंबई- ठाणे, रायगड शहरासाठी आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या मध्यभागावर आणि लगतच्या पूर्व-मध्य प्रदेशावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज विरून गेले आहे. तसेच गुजरात, महाराष्ट्र किनारपट्टीवर कमी दाबाचे द्रोणीय क्षेत्र आहे. यातच आता पावसाचा जोर आता कमी होत आहे.

पुढील चार पाच दिवस हवामान कसे राहील..?
कोकण व गोव्यात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट
आज आणि उद्या म्हणजेच 21 ते 22 तारखेला पालघर, ठाणे, मुंबई, नाशिकचा घाट विभाग, पुणे व साताऱ्याचा घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
रायगड व रत्नागिरीत पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
पुणे शहर व आजूबाजूच्या क्षेत्रात पाऊस कसा असेल?
आज पुणे शहर व आजूबाजूच्या क्षेत्रात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसात घट होणार
मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कमी होईल, मात्र काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता कायम राहील. तर राज्याच्या बहुतांश भागांमध्ये २० ऑगस्टपासून पावसाचा जोर लक्षणीयरीत्या ओसरणार आहे, ज्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.
मुंबई, कोकणात जोर ओसरणार
२० ऑगस्ट रोजी मुंबई शहरासह महानगर परिसरात पावसाचे प्रमाण कमी होईल. दुपारपर्यंत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असून, त्यानंतर पावसाचा जोर आणखी ओसरेल. कोकण पट्ट्यातही पावसाचे प्रमाण कमी होईल, पण काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहू शकतो.
हेही वाचा : महाराष्ट्रात का पडतोय मुसळधार पाऊस? 'या' कारणांमुळे वाढला पावसाचा जोर.. आता कधी ओसरणार? वाचा सविस्तर












Click it and Unblock the Notifications