महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! 'उदय सामंत मोठ्या गटासह भाजपमध्ये जाणार'; या नेत्यांचा दावा!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून, आता खासदार संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. "उदय सामंत हे स्वतः एका मोठ्या गटासह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत," असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला असून, या विधानामुळे सत्ताधारी गोटात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

उदय सामंतांच्या दाव्याला राऊतांचे चोख प्रत्युत्तर
काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांच्याबद्दल विधान केले होते. "अंबादास दानवे लवकरच आमच्या सोबत दिसतील, त्यांची येण्याची प्रोसेस सुरू झाली आहे," असे सामंत म्हणाले होते. या दाव्याची हवा काढताना संजय राऊत म्हणाले की, अंबादास दानवे हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यांनी कधीही पक्ष बदललेले नाहीत. दानवे यांच्यावर शंका घेण्यापेक्षा उदय सामंत यांनी स्वतःच्या भविष्याकडे पाहावे. दावोस दौऱ्यात भाजपसोबत नेमकी काय चर्चा झाली, हे जनतेला लवकरच कळेल, असा सूचक इशाराही राऊतांनी दिला.
"शिंदे सेना ही भाजपचे अंगवस्त्र"
मुंबई महापालिकेतील शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या हालचालींवर भाष्य करताना राऊतांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. ते म्हणाले, शिंदे गटाला आता बाळासाहेब ठाकरे वंदनीय राहिले नसून त्यांना केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच वंदनीय वाटतात. माजी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तरीही शिंदे गटाने साधा निषेधही नोंदवला नाही.
कडाडून टीका
"शिंदेंची शिवसेना ही भाजपचे अंगवस्त्र बनली आहे. एखादी साडी-चोळी पदरात पाडून घेतल्यासारखे त्यांचे राजकारण सुरू आहे," असा टोला त्यांनी लगावला. इतकेच नाही तर, आगामी काळात मुंबईचा महापौर भाजपचाच होईल, अशी योजना आखली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
गिरीश महाजन प्रकरणावर 'सबुरी'चा सल्ला
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यावर राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "मंत्र्यांनी या प्रकरणावर माफी मागितली आहे, त्यामुळे आता हा विषय अधिक ताणू नये," असे ते म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी त्या महिलेचे कौतुक केले जिने गणवेशात असूनही मंत्र्यांच्या चुकीचा धाडसाने निषेध केला.












Click it and Unblock the Notifications