कोण आहे प्रशांत कोरटकर?, मर्सिडीज कार अन् महागड्या मोबाईलचा शौकीन, पोलिसांनी का केली अटक
Who is Prashant Koratkar : शिवरायांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून पोलिसांनी आज अटक केली आहे. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण न्यायालयाने तो फेटाळला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. चला तर जाणून घेऊया प्रशांत कोरटकर यांच्याविषयी, तो नेमका कोण आहे. पोलिसांनी त्याला कसे अटक केले. महाराष्ट्रात नेमका वाद कसा सुरू झाला.

प्रशांत कोरटकर कोण?
प्रशांत कोरटकर गेल्या 25 वर्षांपासून नागपुरात पत्रकार म्हणून कार्यरत आहे. एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीमध्ये विदर्भ ब्युरो चीफ होते. त्यानंतर एका दुसऱ्या न्यूज चॅनलला विदर्भ चीफ म्हणून काम केलं. त्यांनतर माझा विदर्भ नावाचे स्वतःचे युट्युब चॅनल काढलं. सध्या तो याच चॅनलचे मुख्य संपादक आणि मालक आहे.
राज्यातील अनेक मोठ्या IAS, IPS अधिकाऱ्यांसोबत कोरटकर यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. अनेक राजकीय नेत्यांसोबतही त्यांचे जवळचे संबंध आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भेटीचे फोटो सोशल मीडिया वर पोस्ट करून त्यांच्या जवळचा असल्याचं सांगून मंत्रालयात अनेक काम (ट्रान्सफर, पोस्टिंग) केल्याचंही म्हटलं जातं.
कोरटकर हे मर्सिडीज कार, महागडे मोबाईल वापरतात. नागपुरातील मनीष नगर परिसरात ते सध्या राहत असून, त्यांच्या परिवारात पत्नी आणि एक मुलगी आहे. अलीकडच्या काळात ज्योतिषविद्या शिकली असल्यंचे सांगून अनेक मोठे नेते आणि अधिकाऱ्यांना सल्ले देऊन नावलौकिक कोरटकर यांनी मिळवला आहे. कोरटकर नेहमी IPS अधिकाऱ्यांसोबतचे फोटो सोशल मीडिया वर नेहमी पोस्ट करत असतात. तसंच मुंबई, पुणे, इंदोर येथे त्यांचे आलिशान कार्यालय असल्याचे तो सांगतो.
कोरटकर प्रकरणाचा घटनाक्रम काय?
24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजून 8 मिनिटांनी कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती.
इंद्रजित सावंतांचा नंबर त्यानं कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून मिळवल्याची माहिती आहे. 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरटकरनं 27 फेब्रुवारीला एक व्हिडीओ तयार करून माफी मागण्याचा प्रयत्न केला. 28 फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं त्याला अटकपूर्व जमीन मंजूर केला.
कोल्हापूर पोलिसांनी म्हणणं मांडण्याआधीच त्याचा जामीन मंजूर झाला. कोल्हापूर पोलिसांनी त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. 18 मार्चला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला.
दुबईला पळून गेल्याची पसरली होती अफवा
प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. पण अटकेच्या भीतीने तो दुबईला पळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून प्रसार माध्यमांमध्ये सुरू होती. दुबईतील त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.
राहुल सोलापूरकरलाही अटक करा, मिटकरींची मागणी
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, प्रशांत कोरटकर तेलंगणात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा भामटा तब्बल महिनाभर फिरत होता. त्याला फार उशिराने अटक झाली. पण अटक झाली हे महत्त्वाचे आहे. मी याविषयी पोलिसांचे आभार मानतो. या प्रकरी नागपूर पोलिसांच्या कारभारावर मी सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करत होतो. त्यांच्यामुळेच तो नागपुरातून हैदराबादला फरार झाला. आत्ता राहुल सोलापूरकर हा मोकाट राहता कामा नये.












Click it and Unblock the Notifications