आई जगदंबे..! राज्यभर घटस्थापना उत्साहात, साडेतीन शक्तीपिठांवरही पहाटेपासून गर्दी
Navratri 2024 : आजपासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. आज अनेक दुर्गा मंडळांनी घटस्थापना केली. घरोघरीही घटस्थापनेची तयारी सुरु आहे. घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. नऊ दिवस देवीची आरती, पूजा, गरबा आणि इतर अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांची महाराष्ट्रभर रेलचेल दिसणार आहे. राज्यातील साडेतीन शक्तीपिठांवर पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसली.
तुळजाभवानी मंदीर आकर्षक रोषणाईने फुले
तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी माता मंदीरात शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. देवीच्या गाभाऱ्यात दुपारी बारा वाजता मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्निक घटस्थापना करण्यात येणार आहे. पहाटेच मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर विराजमान झाली. पुढील नऊ दिवस मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदीर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

आंबाबाई मंदीरात भाविकांची गर्दी
साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या कोल्हापूरातील श्री अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली. पहाटेपासून मंदीराच्या गाभाऱ्यात मंत्रोपचारात घटस्थापना झाली. सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना झाल्यानंतर तोफेची सलामी देण्यात आली. पहाटेपासूनच मंदीरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या दिसल्या. मंदीर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
माहूर गडावर नवरात्रोस्तवास प्रारंभ
नांदेड जिल्ह्यातील श्री रेणुका मातेच्या माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. शासकीय महापूजा झाल्यानंतर साडेनऊ वाजेपर्यंत घटस्थापना उरकण्यात आली. आज पहिल्या माळेपासून भाविकांचा उत्साह जाणवला. मंदीर देवस्थानकडून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी मंदीर प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
वणी गडावरही भाविकांची रांग
साडेतीन शक्तीपिठापैकी अर्धे पीठ समजल्या जाणाऱ्या वणी गडावर भाविकांनी गर्दी केली होती. मंदीरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. गडावर पहाटेपासून भाविकांच्या रांगा दिसल्या. विधीवत पूजा करुन गडावर घटस्थापना करण्यात आली. मंदीर प्रशासनाने भाविकांची संख्या लक्षात घेता गर्दीचे नियोजन केले आहे. मंदीर परिसर फुले व विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी खासगी वाहनांना गडावर येण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भाविकांना पायी यावे लागत आहे. मात्र असे असले तरी भाविकांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही.












Click it and Unblock the Notifications