अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार का? जाणून घ्या
Maharashtra Budget Session 2025 : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे वेध राज्यातील जनतेला लागले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चार दिवसांवर आले आहे. 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे.
या अधिवेशनादरम्यान 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील जनतेला कमालीची आशा आहे. खासकरुन महिला आणि शेतकरी वर्गाला अर्थसंकल्पातून काय मिळणार याची प्रतीक्षा आहे.

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या योजनेद्वारे महाराष्ट्र सरकार योजनेतील लाभार्थ्यी स्त्रीयांच्या उत्थानासाठी त्यांना आर्थिक सहाय्य म्हणून दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला देते. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असे आश्वासन दिले होते. राज्य अर्थमंत्री अजित पवार यांनीहीह ही रक्कम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मिळणार असे म्हटले होते, त्यामुळे आता लाभार्थ्यांना या अर्थसंकल्पानंतरचा हप्ता 2100 रुपये मिळावा अशी आशा आहे. तो मिळणार का हे आता पाहायचे आहे.
महिला आणि बालविकास विभागाचा 'होऊ दे खर्च..!'
यंदा निधी खर्च करण्यात महिला व बालविकास विभाग अव्वल ठरला आहे. विभागासाठी 6 हजार कोटीच्या आसपास वार्षिक तरतूद असते व त्यातील सुमारे 4 हजार कोटी खर्च केले जातात. मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आणली आणि पुरवणी मागण्यांद्वारे तरतूद वाढविण्यात आली. माहितीनुसार यंदा महिला व बालकल्याण विभागाने 34 हजार 316 कोटी निधीचा वापर करत अव्वल स्थान पटकावले आहे.
कर्जमाफी होणार का?
महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय खूपच मोठा असेल पण लाडकी बहिण योजनेवर होत असलेला खर्च पाहता या अर्थसंकल्पात कर्जमाफी होण्याची शक्यता फारशी करता येणार नाही असे तज्ज्ञांना वाटते.
शेतकरी सन्मान निधीत वाढ होणार का?
शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12 हजारांवरून 15 हजार रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. त्यानंतर सरकार स्थापन होऊन अडीच महिने झाले असून सन्मान निधीत वाढ झालेली नाही आता या अर्थसंकल्पात सन्मान निधीत वाढ होईल अशी आशा वाटते.












Click it and Unblock the Notifications