महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून; विरोधक 'या' मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरणार
Maharashtra Budget Session 2025 : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराची घटना, यासह कायदा-सुव्यवस्थेवरून गृह खात्याला विरोधक चांगलेच लक्ष्य करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर नाउमेद झालेल्या महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून समन्वयाचा पूर्ण अभाव दिसत आहे. तीन पक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध आरोप करतानाही दिसून आले. अशा परिस्थितीत अधिवेशनामध्ये विरोधकांची एकजूट राहणार की नाही, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. जर एकी झाली नाही तर ते आगामी काळात सत्तापक्षाची कितपत कोंडी करू शकतील, हे अवलंबून असेल. एकजूट दाखवण्याची विरोधकांना या अधिवेशनात मोठी संधी असणार आहे.

चहापान की बहिष्कार?
अधिवेशनाची रणनीती ठरण्यासाठी मविआ घटक पक्षांची बैठक रविवारी दुपारी होईल. सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे चहापान असेल. या चहापानाला जायचे की नाही, याचा निर्णय विरोधक त्यांच्या बैठकीत करतील. चहापानावर बहिष्कार टाकतील, अशी शक्यता अधिक आहे. कारण, निवडणुकीनंतर नागपूरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला होता.
विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही?
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. मविआतील कोणत्याही घटक पक्षाकडे 28 पेक्षा जास्त आमदार नाहीत. विरोधी पक्षनेते पदासाठी एक दशांश आमदार हे पद मागणाऱ्या पक्षाकडे असायला हवेत, असा नियम नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा आग्रह असेल. तो मान्य झाला तर भास्कर जाधव यांना हे पद दिले जाऊ शकते. काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव उचलून धरलेले आहे. त्यातच कॉंग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादीचे किती आमदार साथ देणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंडे, कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव
बीड जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी आणि कृषी खात्यातील कथित गैरव्यवहारांप्रकरणी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक अधिवेशनात हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षे कैद्याची शिक्षा सुनावलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक दबाव आणतील.
लाडकी बहीण योजना चालू राहणा की बंद पडणार?
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घोषणा करणार, अर्थमंत्री अजित पवार नेमकं कोणत्या खात्याला किती पैसे देण्याची घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. लाडकी बहीण योजना चालू राहणार का बंद पडणार यावरुन देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. विरोधक लाडकी बहीण योजनेवरुन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे.












Click it and Unblock the Notifications