कोट्यवधींची विकासकामे आणि 70 हजार लाडक्या बहिणी; चंद्रकांत सोनवणेंसाठी निवडणूक सोप्पी
Maharashtra Assembly Election 2024 : आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या चोपडा विधानसभेची निवडणूक यावेळी एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा शिवसेनेच्या दोन गटांत येथे लढत होणार असून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आ. चंद्रकांत सोनवणे तर शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाने येथे ऐनवेळी उमेदवार बदलल्याने शिवसेनेचा एक गट नाराज आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे पारडे येथून जड समजले जात असून विद्यमान आ. लता सोनवणे यांनी केलेली कोट्यवधींची विकासकामेच त्यांचे पती माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाने बदलला उमेदवार
चोपडा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने राजू तडवी यांना उमेदवारी दिली होती. त्यांना पक्षाचा एबी फाँर्मही दिला होता. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी विरोध करत राजीनामा नाट्य केल्याने ठाकरे गटाने ऐनवेळी भाजपचा उमेदवार आयात करुन त्याला उमेदवारी दिली. या मतदारसंघात ठाकरे गटाने प्रभाकर सोनवणे यांना मैदानात उतरवले आहे. मात्र यामुळे तडवी गट नाराज झाला असून तो ठाकरे गटाचे काम करेल का, ही शंकाच आहे.
ठाकरे गट व शरद पवार गटही नाराज
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या जागेवर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचा दावा होता. ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराती यांनी गेली कित्येक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. मात्र ही जागा ऐनवेळी ठाकरे गटाने घेतली. शिवाय ठाकरे गटाने राजू पडवी यांना अचानक पक्षप्रवेश देत त्यांना उमेदवारी दिली. या सगळ्या प्रकारानंतर स्थानिक ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज झाले. त्यानंतर ठाकरे गटाने ऐनवेळी भाजपच्या प्रभाकर सोनवणे यांना पक्षप्रवेश देत उमेदवारी दिली. एकीकडे जागा सुटली नसल्याने शरद पवार गट नाराज असतानाच आता ठाकरे गटानेही आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडी बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे.
सोनवणे कुटुंबाला निवडणूक सोप्पी
माजी आ. व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांनी या मतदारसंघात त्यांच्य कार्यकाळात कोट्यवधींचा निधी आणला. त्यांच्या पत्नी व विद्यमान आ. लताबाई सोनवणे यांनीही गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदललाय. त्यामुळे सोननणे दांप्पत्याला विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढविणे सोप्पे असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. महायुती सत्तेवर आल्यानंतर शेवटच्या दोन-अडीच वर्षांत लताबाई सोनवणे यांनी या मतदारसंघात 534 कोटींची विकासकामे केली आहेत. शिवाय प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनीही वैजापूर येथील मुलींच्या वस्तीगृहासाठी 14 कोटींचा निधी आणून मुलींच्या शिक्षणाची सोय केली आहे. याशिवाय रस्ते, वीज, पाणी यांवरही या मतदारसंघात महायुतीने शेकडो कोटींचा खर्च केलेला आहे.
महायुतीचा विकासकामांचा डोंगर
अनेर नदीवर 21 कोटींचे बंधारे, निमगव्हाण ते वैजापूर रस्त्याचे 210 कोटींचे काँक्रीटीकरण, बुधगाव ते खामखेडा रस्त्याचे 208 कोटींचे काँक्रीटीकरण, अनेर नदीवर 10 कोटींचा पूल, वैजापूर येथे साडेचौदा कोटींची आश्रमशाळा, खामखेडा ते देवझिरीपर्यंतचा 21 कोटींचा रस्ता आदी विकासकामे हे महायुती सरकारच्या काळात या मतदारसंघात झाली. याशिवाय शेतीसाठी बारमाही पाण्यासाठी महत्त्वाचे असलेले हंड्याकुंड्या धरणाला मंजूरी मिळाली असून तो प्रकल्पही लवकरच सुरु होणार आहे. जलयुक्त शिवार योजेची 9 कोटींची कामेही पूर्ण झाली आहेत. याशिवाय यावल सिंचन योजनाही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे. या दोन्ही योजनांचा सुमारे 50 हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे पालटले रुप
चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय हे आता दोनशे खाटांचे करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा मिळणार आहे. या रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी खाटांचा अतिदक्षता विभाग, नेत्ररोग विभाग, अस्थिरोग विभाग, स्त्री रोग विभाग, सीटी स्कॅन आदींची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. आ. लताबाई सोनवणे व माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या पुढाकारानेच हे काम झाल्याने त्यांचे पारडे सध्यातरी जड दिसत आहे.
लाखो लाभार्थी महायुतीच्या पाठीशी
चोपडा तालुक्यात लाडकी बहिण योजनेसह महायुती सरकारच्या विविध योजनांचे लाखो लाभार्थी आहेत. हे लाभार्थी महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तालुक्यात सुमारे 70 हजार महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला. या लाडक्या बहिणींमुळेच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ठाकरे गटाच्या उमेदवाराला वरचढ ठरतील, अशी शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications