राहुरीत पुन्हा तनपुरे विरुद्ध कर्डिले सामना, विखे पाटीलही इच्छुक
Maharashtra Assembly Election 2024 : दसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे सर्वच पक्ष, इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातही राजकीय हालचालींनी जोर धरला आहे. भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडून माजी खासदार सुजय विखे पाटील हेही इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सुरस पाहायला मिळत आहे.
सन 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे शिवाजी कर्डिले यांचा 23 हजार 326 मतांनी पराभव केला होता. यंदा कर्डिले यांनी त्यांच्या त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही काळापूर्वी चर्चा होती की कर्डिले यंदा श्रीगोंद्यातून निवडणूक लढवणार, मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ते राहुरीतूनच निवडणूक लढणार आहेत.
सुजय विखे इच्छुक
भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी मतदार संघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता महायुतीकडून कर्डिले आणि विखे दोघे प्रबळ दावेदार आहेत.

तनपुरे विरुद्ध कर्डिले शीतयुद्ध
राहुरी मतदारसंघात तनपुरे आणि कर्डिले यांच्यातील राजकीय संघर्ष दीर्घकाळापासून सुरू आहे. 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांत कर्डिले यांनी विजय मिळवला होता. मात्र, 2019 मध्ये प्राजक्त तनपुरे यांनी विजय मिळवून राष्ट्रवादीचे वर्चस्व पुनःस्थापित केले. प्राजक्त तनपुरे हे तनपुरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत, आणि त्यांच्या विजयाने तनपुरे कुटुंबाचा राजकीय वनवास संपला.
मराठा मतदारांचा प्रभाव
शिवाजी कर्डिले यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यंदा राहुरीत निवडणुकीचे समीकरण आणखी जटील होऊ शकते, कारण धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे यांचे नाव देखील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. शेटे यांचा तरुण पिढीवर प्रभाव आहे, आणि मराठा समाजाच्या मतांचा कल जर शेटे यांच्याकडे झुकला, तर तनपुरे, कर्डिले आणि शेटे अशी तिरंगी लढत होऊ शटते. यात मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.
राहुरी मतदार संघाची रचना
राहुरी विधानसभा मतदारसंघाची रचना खास आहे. लोकसभेसाठी या मतदारसंघातील काही गावे अहमदनगर आणि काही शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे येथे दोन खासदार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ गावन गाव पिंजून काढले. लंके विजयी झाले असले तरीही राहुरीतून त्यांना अपेक्षित मतं मिळाली नाहीत. त्यामुळे विधानसभेसाठी तनपुरे आणि महाविकास आघाडीला अधिक जोर लावावा लागणार आहे.
या आहेत समस्या
राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अनेक वर्षांपासून खितपत पडला आहे. रुग्णालयाची जागा उपलब्ध असताना गेल्या आठ वर्षापासून तात्पुरत्या तीन मजली इमारतीत हे रूग्णालय सुरू आहे. येथील नागरीकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील रस्ते, वीज, शेतमालाला अल्प भाव, बेरोजगारी अशा समस्या आहेत. पण, विद्यमान आमदार तनपुरे यांनी अनेक समस्या सोडविल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.












Click it and Unblock the Notifications