हिंगोलीत पुन्हा मुटकुळे विरुद्ध गोरेगावकर सामना?
Maharashtra Assembly Election 2024 : मराठवाड्यातील शेवटचा मतदारसंघ म्हणून हिंगोली विधानसभा मतदार संघ ओळखला जातो. हिंगोली आणि सेनगाव या दोन तालुक्यांनाचा मिळून हा मतदार संघ तयार झालेला आहे. भाजपचे तान्हाजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी सलग दोन वेळा या मतदार संघात विजय मिळवला आहे. यावेळी त्यांच्या समोर महाविकास आघाडीचे आव्हान असेल. मात्र जागा वाटपात हा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार यावर पुढील गणित ठरणार आहेत.
आमदार तान्हाजी मुटकुळे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार असून, त्यांनी तशी तयारी सुरू केली आहे. तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्यासाठी मुटकुळे यांना पक्ष संधी देईल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटत आहे; मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी लोकसभेपूर्वी तंबी दिली होती की, लोकसभा निवडणुकीत ज्या आमदारांच्या कार्यक्षेत्रात मतं कमी मिळतील, त्यांचे तिकीट कापले जाईल. त्याप्रमाणे विचार केल्यास उमेदवार बदलाचा विषय ठरू शकतो. त्यांना पर्याय म्हणून भाजपचे नेते रामदास सुमठाणकर प्रबळ दावेदार आहेत. सुमठाणकर हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण, हिंगोलीची जागा महायुतीत शिंदे गटाच्या वाट्याला गेली. आता त्यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीकडून कोण?
काँग्रेसकडून हिंगोली विधानसभेसाठी तीन टर्म आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर इच्छुक आहेत. मात्र, असं असलं तरी हिंगोली विधानसभेत काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचं सर्वत्र दिसत आहे. कॉंग्रेसमध्ये भाऊराव पाटील गट आणि सातव गट असे हे दोन गट आहेत. सातव गटाचा भाऊराव पाटील यांना विरोध आहे. सातव गटाकडून प्रकाश थोरात आणि सुरेश सराफ हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांचे नाव चर्चेत आहे.
मनसेचा उमेदवार जाहीर, संभाजी ब्रिगेड तयारीत
मनसेकडून जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांची उमेदवारी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. तर मविआचा घटक पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने या विधानसभेवर दावा केला. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज आखरे हे निवडणूक लढविणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. वंचित बहुजन आघाडीसुद्धा मैदानात असणार आहे.
जातीय समीकरणे
भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ लहान आहे. या भागात अनेक वस्ती-तांडे आहेत. त्यांचे अनेक प्रश्नही आहेत. त्याच बरोबर हिंगोली विधानसभा मतदारसंघातील लोकसंख्येचा विचार केला तर मराठा मतदारांसह दलित, मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक आहे.
या आहेत समस्या
हिंगोली जिल्ह्याची निर्मिती होऊन 26 वर्ष झाली. पण, आजही शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात जिल्हा मागासलेला आहे. गंभीर आजारांच्या रुग्णांना नांदेड किंवा अकोल्याशिवाय पर्याय नाही. अजूनही अनेक शासकीय कार्यालये परभणीतच आहेत. हिंगोलीला स्वतंत्र जिल्हा बॅंक नाही. हिंगोलीच्या तुलनेत सेनगाव तालुका अजूनही मागासलेला आहे. या मतदारसंघातून महामार्ग गेला. पण, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. बेरोजगारी, पाणी, शेतमालाला अल्प भाव आदी समस्या आहेत. पण, भाजपने या भागात अनेक समस्या मार्गी लावल्या. महामार्गामुळे विकासाला गती मिळेल, असा दावा अनेकांनी केला.
गतवेळी काय झाले होते?
वर्ष 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे तान्हाजी मुटकुळे यांनी काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा 24 हजार 065 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली. हिंगोली विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार नागेश आष्टीकर यांनी शिवसेनेच्या हेमंत पटेल यांचा 1 लाख 8 हजार 602 मतांनी पराभव केला.












Click it and Unblock the Notifications