माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या लेकीसाठी CM शिंदे मैदानात; म्हणाले- मी शब्द दिला तो पाळतोच
Maharashtra Assembly Election 2024 : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी तसेच भोकर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले आहेत. नांदेड जिल्ह्यात झालेल्या प्रचारसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तर मी एकदा दिलेला शब्द मोडत नाही, त्यासाठी मी काहीही करायला तयार असतो, असेही शिंदे म्हणाले.
विचार करुन शब्द देणारे आम्ही माणसे
एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर काम करत आहोत. त्यांनी आम्हाला एखादा शब्द देताना आधी शंभर वेळा विचार करण्याचे शिकवले आहे. शंभर वेळा विचार करूनच मी एखादा शब्द देतो. त्यामुळे या मतदारसंघाच्या विकासाबाबत तुम्ही निश्चिंत रहा. लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे हे कायम सुरू राहतील, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी देखील शेतकरी कुटुंबातून आलो आहे. सर्वसामान्य कुटुंबातील आलो आहे. त्यामुळे जे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आले, त्यांना दीड हजार रुपयांची किंमत कळणार नाही. ती किंमत आम्हाला कळते. शेतकऱ्यांना देखील शून्य बिल दिले जात असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

जो पर्यंत चंद्र-सूर्य तोपर्यंत संविधान राहणार
हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशा सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी आपण योजना आणली आहे. शेतकरी देखील सर्व जाती धर्माचे आहेत. त्यामुळे सर्वांना योजनेचा लाभ होतो. मात्र, लोकसभेमध्ये फेक नरेटिव्हच्या माध्यमातून संविधान बदलेल, अशी भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण केली गेली. या फेक नरेटिव्हमुळे वेगळ्या पद्धतीचे मतदान झाले. मात्र जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे. तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला कोणीही हात लावू शकणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राहुल गांधी आरक्षण संपविण्याच्या विचारात
काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार असल्याची भूमिका मांडतात. ते विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. हेच त्यांचे देशप्रेम असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आपल्या भारत देशाचे नाव जगभरामध्ये मोठे करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशातील आरक्षण संपविण्याचा डाव राहुल गांधींचा आहे, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी गांधींवर केला.












Click it and Unblock the Notifications