ईव्हीएम हॅक करता येते... महादेव जानकरांच्या दाव्याने खळबळ; म्हणाले, मी स्वतः...
Mahadev Jankar claims that EVMs are being hacked- विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सपाटून मार खावा लागला होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. आता याच ईव्हीएम वादात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही उडी घेतली आहे. ईव्हीएम हॅक करता येतं, असं धक्कादायक विधान जानकर यांनी केलं. जानकर हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहीले असूनही त्यांनी असं विधान केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले जानकर?
ईव्हीएमबाबत बोलताना महादेव जानकर म्हणाले, ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळेच महायुतीच्या एवढ्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. आम्ही याविरोधात देशभर आंदोलन करू. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळं मला सगळं माहीत आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, हे सगळे त्यांचेच आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याचं काम झालंय, असा थेट आरोप जानकर यांनी केलाय.
महायुतीवर जोरदार टिका
महायुतीवर टिका करताना जानकर म्हणाले, माझा महायुतीसोबतचा अनुभव अतिशय वाईट होता. त्यांच्यासोबत वेगळा अनुभव आल्यानेच मी त्यांच्यापासून दूर गेलोय. मी काँग्रेसला अजून चाखलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडे न जात मी एकटं चालण्याचा निर्णय घेतला. यापुढे आपल्या पक्षासाठी स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. महायुतीने गेल्या विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटलाय. त्यांच्यामुळेच लोकशाही धोक्यात आलीय, असा आरोपही जानकर यांनी केला.
स्वतःच्या आमदारालाही दिला इशारा
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्याबाबत बोलताना महादेव जानकर म्हणाले, रत्नाकर गुट्टे हा माझ्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे. कोणासोबत जायचं, याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जर त्याने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू. मला सगळ्या गोष्टीच्या ठेचा लागल्या आहेत. त्यामुळं मी सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळं माझा एक आमदार असला तरी तो पक्षावर दावा सांगू शकत नाही.












Click it and Unblock the Notifications