मिस्टर संभाजी भोसले, तुम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाही - लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake on Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती तुम्हाला राजे म्हणायला देखील लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचे आणि शिवरायांच्या विचारांचे देखील वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले,ही रयत तुम्हाला राजा म्हणून कधीच मानणार नाही, अशी घणाघाती टीका ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली. सोमवारी वडीगोद्री येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती यांनी आज आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा उपोषणकर्ते जरांगे पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी ओबीसी आंदोलकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. यावर हाके यांनी प्रत्युत्तर दिले.

शोषितांचा कळवळा आहे का तुम्हाला?
हाके पुढे बोलताना म्हणाले की, संभाजीराजे छत्रपती यांना शोषितांचा कळवळा नाही. मनोज जरांगे यांचे आंदोलन राजकारणासाठीच करण्यात आलेले होते. मराठवाड्यातल्या बारा बलुतेदारांच्या दुकानावर हल्ले झाले, नाभिक समाजाच्या लोकांच्या दुकानांवरती हल्ले झाले, हे कशात बसते?, याचा देखील विचार केला पाहिजे.
तेव्हा तुम्ही चिथावणी देत बसला होतात
हाके पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य निर्माण होण्यासाठी अठरापगड जातींनी जीवाची कुर्बानी दिली. संभाजी भोसले आता मी तुम्हाला राजा म्हणणार नाही. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. मिस्टर संभाजी भोसले विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता-माऊली लढत होत्या, तेव्हा तुम्ही हात वर करून चिथावणी देत होता. त्या जरांगेंनी त्याच्या बॅनरवर छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा वापरली आहे का? आम्ही एका जातीची मागणी करत नाही, अठरापगड जातीच्या हक्काच्या लढ्यासाठी आमचे आंदोलन आहे.
अरे जात चोरतात तर तुम्ही
लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जोरदार आगपाखड केली. अरे जात चोरतात तुम्ही. त्यासाठी मागासवर्गीय जन्माला यावं लागतं. जन्माने मागासवर्गीय असावा लागतो. नाहीतर राज्य मागासवर्ग आयोगाच्या पॅरामीटर्समध्ये यावं लागते. एका बाजूला 96 कुळी मराठा दुसऱ्या बाजूला मागासवर्गीयांच्या आरक्षण मागायचं. संभाजी भोसले तुम्हाला आम्ही राजे का म्हणायचं?
तर तुम्ही आमच्या आंदोलनाला भेट दिली असती
छत्रपती शिवरायांच्या शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता तर तुम्ही या आठवडा पगड जातीच्या भटक्यांच्या निमित्तांच्या आंदोलनात भेट दिली असती. राजा हा राजा राणीच्या पोटातून नाही आंबेडकरांच्या संविधानातून जन्माला येतो. इथून पुढे ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. ओबीसी नेते जोपर्यंत दबावत राहतील तेव्हा जरांगे तुमच्या मानगुटीवर बसेल. ओबीसी नेत्यांनो जर तुम्ही या लोकांच्या दबावखाली राहाल तर महाराष्ट्रातून तुमचं अस्तित्व संपवलं जाईल, असेही हाके यांनी म्हटले.












Click it and Unblock the Notifications