लातूर शहरात अमित देशमुखांसमोर डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी उभे केले आव्हान! कोण जिंकणार?
Latur city Assembly election 2024 : लातूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक हळूहळू तीव्र रंगत आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या माजी मंत्री आणि तीन वेळा विजयी झालेले आमदार अमित देशमुख यांना चौथ्यांदा विजयी होण्याचे आव्हान आहे. त्यांच्यासमोर भाजपच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी आव्हान उभे केले आहे. एकूण 23 उमेदवार रिंगणात असले तरी देशमुख विरुद्ध चाकूरकर असा प्रमुख सामना दिसून येतोय.
काँग्रेसचा बालेकिल्ला लातूर
लातूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी पाचवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले, तर त्यांच्या निधनानंतर अमित देशमुख यांनी याच वारशाला पुढे नेले. गेल्या पंधरा वर्षांपासून अमित देशमुख या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामध्ये त्यांनी विविध विकास कामे हाती घेऊन मतदारांची मने जिंकली आहेत.

भाजपची नव्या चेहऱ्याची रणनीती
यावेळी भाजपने डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली आहे. माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या चाकूरकर यांना स्थानिक मतदारांमधील असंतोष आणि लिंगायत मतांचा लाभ मिळेल, असा अंदाज आहे. प्रचारादरम्यान त्यांनी देशमुखांविरुद्ध विकासाचे मुद्दे उपस्थित करत मतदारसंघात अधिक हजेरी राहून काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
लातूरमधील कळीचे मुद्दे
लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचा दीर्घकालीन प्रश्न आजही प्रलंबित आहे. उजनी प्रकल्पाच्या माध्यमातून लातूरला पाणीपुरवठा करण्याचे मुद्दे हाती घेतले जात असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्याशिवाय, स्थानिक विमानतळाच्या सुविधा वाढवण्याची आणि विविध मोठ्या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, कचरा व्यवस्थापन, तरुणांना रोजगाराच्या संधी, जिल्हा रुग्णालयातील तातडीच्या सेवा, आणि सोयाबीन हमीभाव या मुद्द्यांवरही निवडणूक चालू आहे. भाजपने जातीय समीकरणांची जुळवाजुळव करताना लिंगायत मतांवर लक्ष केंद्रित केले आहे, तर काँग्रेसने एकोप्याचा मुद्दा उभा करून वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
सन 2019 निवडणुकीचा परिणाम आणि यंदाची रणनिती
सन 2019 च्या निवडणुकीत अमित देशमुख यांनी 1 लाख 11 हजार 156 मते मिळवून विजय मिळवला होता, तर भाजपचे शैलेश लाहोटी यांना 70 हजार 471 मते मिळाली होती. यावेळी मात्र शिवसेना, भाजप, आणि एनसीपीचे अजित पवार यांचा आघाडीमध्ये एकत्र येण्यामुळे अमित देशमुख यांची वाट खडतर आहे.

मतदारसंघाचे जातीय समीकरण
लातूरमध्ये मराठा मतदार 26% असून लिंगायत समाज 25% आहे. याशिवाय दलित आणि मुस्लिम मतांची संख्या अनुक्रमे 23% आणि 29% आहे. काँग्रेसचा मराठा आणि मुस्लिम मतदारांवर विश्वास आहे, तर भाजपने लिंगायत समाजाला आकर्षित करण्याची रणनीती आखली आहे.
हेही वाचा : लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप! धीरज देशमुखांना रमेश कराडांचे तगडे आव्हान पण कोण जिंकणार?
प्रचाराची रंगत
दिल्ली आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते मतदारसंघात सभांचा धडाका लावत आहेत. अमित देशमुख हे काँग्रेसच्या मराठवाड्यातील प्रमुख चेहरा बनले आहेत. त्यांच्यासाठी लातूरची निवडणूक ही प्रतिष्ठेची बाब आहे, तर भाजपने अर्चना पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून एक नवा चेहरा उभा करून काँग्रेसला आव्हान दिले आहे. लातूर मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपचा थेट सामना होत आहे. काँग्रेसला आपला बालेकिल्ला राखण्याची जबाबदारी आहे, तर भाजपला नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. मतदारसंघातील प्रमुख मुद्दे, जातीय समीकरणे, आणि दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा यामुळे या निवडणुकीतील रंगत अधिकच वाढली आहे.
हेही वाचा : भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप लढत!कोण जिंकणार तिरुपती कोंढेकर की, श्रीजया चव्हाण?












Click it and Unblock the Notifications