Latur Accident:लातूर-बार्शी मार्गावरील उड्डानपुलावर भीषण अपघात, रिक्षातील तिघे जागीच ठार, थरारक घटना
Latur Accident News : लातूर शहरातील लातूर-बार्शी मार्गावरील उड्डाणपुलावर सोमवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी आहेत. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमींवर सद्या उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लातूर बार्शी महामार्गावरील एका उड्डानपुलावर अपघाताची सोमवारी सायंकाळी घटना घडली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, अपघात एवढा भीषण होता की रिक्षामधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. उड्डाणपुलावर ट्रॅक्टरला ऑटो रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी लोकांनी सांगितले.

कसा झाला अपघात, काय आहे मृतांची नावे?
शहरातील उड्डाणपुलावर ऑटो रिक्षाने ट्रॅक्टरला पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात झाला, हा अपघात एवढा भीषण होता की ऑटो रिक्षा चक्काचूर झाला आहे. या घटनेत ऑटो रिक्षामधील तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. तर, एका प्रवाशाला किरकोळ मार लागला आहे.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
प्रतीक्षा संतोष पस्तापुरे (वय 10) राहणार बारा नंबर पाटी लातूर, सुमन सुरेश धोत्रे (वय 25) रा. सावेवाडी लातूर आणि शिवाजी दयानोबा कटलाकुटे (वय 62) वर्ष राहणार बारा नंबर पाटी लातूर, अशी या अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील दोन गंभीर जखमी रुग्णावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या दोघांना डोक्याला जबर मार लागल्याची माहिती आहे.
लातूर MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळतात तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच, घटनेची माहिती कळताच यातील मृत आणि अपघातग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले. या अपघाताने लातूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications