लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? आदीती तटकरेंनी थेट सांगितलं, 'या' महिलांना मिळणार नाही पैसे
Ladki Bahini Yojana : राज्यात लाडकी बहिण योजनेचा गाजावाजा होत आहे. सर्वात लोकप्रिय ठरलेली या योजनेच्या जोरावर महायुतीने राज्यात सत्ता स्थापन केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान महायुतीने राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये मानधन प्रतिमहिना देऊ असे जाहीरनाम्यातून आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांना हे आश्वासन कधी प्रण केले जाते याची प्रतिक्षा लागून राहीली आहे.
दुसरीकडे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये प्रतिमहिना मानधन देण्याची घोषणा होईल अशी आशा होती पण तशी घोषणाच न झाल्याने महिलांचा हिरमोड झाला आहे. आता विधानसभेत आज महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी 2100 रुपये कधी मिळणार यासंदर्भात घोषणा केली आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?
"ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी 2 कोटी 33 लाख 33 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला, ही संख्या आता 2 कोटी 47 लाख झाली. या योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये मदत देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल." अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात आमदार रोहित पवार, वरुण सरदेसाई यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
'या' महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ
नमो सन्मान योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं तटकरे यांनी स्पष्ट केलं. मात्र अशा महिलांना एक हजार रुपये नमो सन्मान योजनेतून आणि पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातील असं त्या म्हणाल्या.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत 36 लाख कोटी रुपयांची तरतूद
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत 33 लाख 232 हजार कोटी खर्च झाला आहे असे अजित पवार यांनी सभागृहातील आपल्या भाषणादरम्यान सांगितले. आता पुढच्या वर्षांसाठी 36 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी करण्यात आली आहे. आगामी वर्षात 24 लाख महिलांना लखपती करणार असल्याचेही अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभेत विरोधकांचा सभात्याग
आदिती तटकरे यांनी दिलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रश्न विचारण्याची परवानगी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मागितली. मात्र यावर विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळून लावत पुढचं कामकाज सुरू केलं. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला.












Click it and Unblock the Notifications