Ladki bahin yojana : लाडक्या बहीणींना बिनव्याजी कर्ज कसे मिळणार? जाणून घ्या अटी, नियम अन् फायदे
Ladki bahin yojana interest free loan : राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून महिलांना केवळ दरमहा आर्थिक मदतच नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता या योजनेतील लाभार्थी महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज (Interest-Free Loan) उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही सामान्य कुटुंबातील लाडक्या बहिणींसाठी मोठी बाब असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाईंदर येथील 'नारी शक्ती संगम' परिषदेत या मास्टरप्लॅनचा उलगडा केला.

नेमकी योजना काय आहे?
राज्य सरकारने 'लाडकी बहीण' योजनेला आता बँक कर्ज योजनांशी जोडले आहे. ज्या महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय, उद्योग किंवा बचत गटाच्या माध्यमातून काही उपक्रम सुरू करायचा आहे, त्यांना हे कर्ज दिले जाईल.
१. जामीनदाराची गरज नाही
सामान्यतः बँक कर्ज घेताना जामीनदार किंवा मालमत्ता गहाण ठेवावी लागते. मात्र, या योजनेत महिलांना कोणत्याही हमीदाराशिवाय (Guarantor) कर्ज मिळणार आहे.
२. लाडकी बहीण योजनेचा हप्ताच 'हप्ता' ठरणार
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, कर्जाच्या परतफेडीचे टेन्शन महिलांना नसेल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी दरमहा ठराविक रक्कम हीच या कर्जाच्या परतफेडीसाठी (EMI) वापरली जाईल. म्हणजे महिलांना खिशातून वेगळे पैसे देण्याची गरज पडणार नाही.
३. मुंबई बँकेचा पुढाकार
'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, सुरुवातीला मुंबई बँकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार असून, महिलांना त्यांच्या व्यावसायिक गरजेनुसार बिनव्याजी भांडवल पुरवले जाईल.
अटी आणि नियम
- लाभार्थी पात्रता: अर्जदार महिला 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची पात्र लाभार्थी असणे अनिवार्य आहे.
- उमेद उपक्रम: या कर्जाची अंमलबजावणी शासनाच्या 'उमेद' (MSRLM) अभियानामार्फत केली जाईल. त्यामुळे महिला बचत गटातील सदस्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
- व्यावसायिक उद्देश: हे कर्ज केवळ चैनीसाठी नसून, कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा उत्पादन सुरू करण्यासाठीच दिले जाईल.
- परतफेड: कर्जाची रक्कम मर्यादित असेल, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या मानधनातून त्याची वसुली सहज होऊ शकेल.
यामुळे महिलांना काय फायदा होईल?
स्वतःचा मालकीचा व्यवसाय: लाडक्या बहिणींना भांडवलाअभावी रखडलेले छोटे उद्योग (उदा. शिवणकाम, घरगुती खानावळ, हस्तकला) सुरू करता येतील.
बाजारपेठ उपलब्ध: लाडक्या बहिणींना उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारले जाणार आहेत, ज्यामुळे महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळेल.
आर्थिक पत वाढणार: महिलांचा कर्ज परतफेडीचा दर ९९% असल्याने, या बिनव्याजी कर्जामुळे त्यांची बँकिंग क्षेत्रातील विश्वासार्हता (CIBIL) वाढेल.
हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात येत नाहीत? लगेच तपासा e-KYC स्टेटस; अर्ज दुरुस्ती कशी करायची? वाचा












Click it and Unblock the Notifications