लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा! संक्रांतीची मिळाली गोड भेट; खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात
Ladki Bahin Yojana Maharashtra : राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आनंदाची बातमी समोर आली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला.
विशेष म्हणजे, आजपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच अनेक महिलांच्या मोबाईलवर 'मेसेज' पडू लागल्याने बहिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले आहे.

आचारसंहितेचा अडथळा दूर
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकांमुळे राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने योजनेचे पैसे मिळणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
आयोगाच्या नियमानुसार, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ज्या योजना प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत, त्या सुरू ठेवण्यास परवानगी आहे. याच आधारावर मुख्य सचिवांच्या अहवालानंतर आयोगाने डिसेंबर महिन्याचा नियमित हप्ता वितरित करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
3000 ऐवजी 1500 का मिळतायत?
सुरुवातीला महायुतीतील काही नेत्यांकडून आणि सोशल मीडियावरून अशी चर्चा पसरली होती की, संक्रांतीनिमित्त डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये दिले जातील. मात्र, निवडणूक आयोगाने याला 'अग्रिम' लाभ मानून मज्जाव केला आहे.
नियमित हप्ता देता येईल, पण पुढच्या महिन्याचे पैसे आधी देता येणार नाहीत आचारसंहिता काळात नवीन लाभार्थी निवडता येणार नाहीत. त्यामुळे, केवळ डिसेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता सध्या महिलांच्या खात्यात जमा होत आहे.
विरोधकांचे आक्षेप आणि आयोगाचा निर्णय
15 जानेवारीला मतदान असताना 14 जानेवारीपर्यंत पैसे वाटणे हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या तक्रारींची दखल घेत आयोगाने वस्तुस्थिती जाणून घेतली.
अखेर, ही योजना जुनीच असल्याने तिचा नियमित लाभ रोखता येणार नाही, असा मध्यममार्ग काढण्यात आला. यामुळे आचारसंहितेच्या कात्रीत अडकलेल्या लाडक्या बहिणींची सुटका झाली असून मतदानापूर्वीच त्यांना सरकारी मदतीचा हात मिळाला आहे.
बहिणो, असे तपासा आपले पैसे
१. मोबाईल मेसेज : बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईलवर एसएमएस तपासा.
२. बँक पासबुक : जवळच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा.
३. UPI ॲप्स : गुगल पे, फोन पे किंवा सरकारी पोर्टलच्या माध्यमातून बँक बॅलन्स चेक करा.












Click it and Unblock the Notifications