कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी कुंडलिक खांडेंची शिवसेनेतून हकालपट्टी
बीड : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी तसं पत्र देखील काढले आहे. शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.

दरम्यान काही दिवसांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती. या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आपण पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केलं असून बजरंग बाप्पांना मदत केली असल्याचं ऐकण्यात येत आहे.तसेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करुन त्यांची गाडी फोडण्याबाबतचे वक्तव्य केल्याचंही ऐकायला मिळत आहे.
या क्लिपमध्ये म्हटलं आहे की, आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे यांना धोका दिला आहे. या ऑडीओ क्लीपमध्ये कुंडलिक खांडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीत मोठं वादळ निर्माण झाले आहे. बीड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे निवडून आले आहेत. पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या फटका या ठिकाणी बसला असल्याचे म्हटले जात आहे. धनंजय मुंडे यांनी देखील कुंडलिक खांडे यांच्यावर टिका केली होती. कथित ऑडिओ प्रकरणामुळे चर्चेत असलेले बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पक्षाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
खांडेंच्या कार्यलयाची झाली होती तोडफोड
कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटल्याचं पाहायला मिळाले. संबधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते.
बीड लोकसभा मतदारसंघात अटीतटीची निवडणूक झाली
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्या दरम्यान अत्यंत शर्थीची निवडणूक झाली. दोन्ही बाजूनी या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली होती. धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीची धुरा स्वतःच्या हाती घेतली होती. मात्र हळूहळू या निवडणुकीला जातीय वळण लागले. निवडणुकीत झालेली चुरस प्रत्यक्ष मोजणीच्या वेळेला देखील दिसून आली. क्षणाक्षणाला पारडे दोन्ही बाजूनी झुकत होते, शेवटच्या फेरीपर्यंत रंगत कायम होती. आणि अवघ्या 6 हजार मतांनी पंकजा मुंडे पराभूत झाल्या हा पराभव सहन न झाल्याने पंकजा मुंडे यांच्या अनेक समर्थकांनी आत्महत्या केल्या.












Click it and Unblock the Notifications