'धंगेकर पॅटर्न' विरुद्ध 'तुरुंगातील उमेदवारी'; प्रतिभा धंगेकरांचे पारडे जड?
पुणे महानगरपालिका निवडणुकीचे (Pune Municipl Election) बिगुल वाजले असून, सर्वांचे लक्ष लागलेल्या प्रभाग २४ (कसबा-कमला नेहरू रुग्णालय) मध्ये आता प्रचाराचा धुरळा उडाला आहे. या प्रभागात खरी लढत शिवसेनेच्या (शिवसेना) प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) सोनाली आंदेकर यांच्यात होत आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती आणि मतदारांचा कल पाहता प्रतिभा धंगेकर यांचा नरेटिव्ह कसब्यात प्रभावी ठरताना दिसत आहे.

१. 'जनसेवेचा वारसा' विरुद्ध 'गुन्हेगारीचे सावट'
प्रतिभा धंगेकर यांच्या प्रचाराचा मुख्य कणा हा त्यांचे पती, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेली विकासकामे हा आहे. "कसब्याचा विकास आणि सर्वसामान्यांचे प्रश्न" हा मुद्दा घेऊन धंगेकर मैदानात आहेत. दुसरीकडे, सोनाली आंदेकर या सध्या एका गंभीर गुन्ह्याखाली तुरुंगात असून तिथूनच निवडणूक लढवत आहेत. "प्रतिनिधी जनतेत हवा की तुरुंगात?" हा प्रश्न धंगेकर समर्थकांकडून मतदारांच्या मनात रुजवला जात आहे.
२. सामान्यांच्या हक्काचा 'होम डिलिव्हरी' विकास
रवींद्र धंगेकरांची ओळख 'सर्वसामान्यांसाठी धावून जाणारा नेता' अशी आहे. तोच वारसा प्रतिभा धंगेकर पुढे नेत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. "आमदार असो वा नसो, धंगेकर कुटुंब नेहमीच लोकांच्या सुख-दुःखात उभे असते," हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात त्या यशस्वी ठरत आहेत.
३. महिला मतदारांचा वाढता कल
प्रभागातील महिला मतदारांशी संवाद साधताना प्रतिभा धंगेकर आपल्या साधेपणावर भर देत आहेत. "एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि जनतेसाठी उपलब्ध असणारी महिला प्रतिनिधी" म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात उमटत आहे. याउलट, आंदेकर कुटुंबाभोवती असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीमुळे सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदार धंगेकरांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
४. 'तुरुंगातून कारभार' मतदारांना मान्य नाही?
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात तुरुंगात असलेल्या व्यक्तीला मतदान करणे शहराच्या प्रतिमेला साजेसे नाही, असा मुद्दा धंगेकर गटाने प्रभावीपणे सेट केला आहे. "आपल्या प्रभागाचे प्रश्न मांडण्यासाठी प्रतिनिधी सभागृहात हवा, तुरुंगात नाही," हा मुद्दा मतदारांना विचार करायला भाग पाडत आहे.
सोनाली आंदेकर यांना त्यांच्या समर्थकांकडून मिळणारी सहानुभूती ही केवळ एका विशिष्ट भागापुरती मर्यादित असल्याचे दिसत आहे. मात्र, संपूर्ण प्रभाग २४ चा विचार केला तर प्रतिभा धंगेकर यांचे 'विकास आणि विश्वासार्हता' हे मुद्दे सध्यातरी वरचढ ठरताना दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications