कसब्यात 'धंगेकर पॅटर्न'ची पुनरावृत्ती? कसब्यात धंगेकरांच्या 'प्रणव'चा शड्डू!
पुणे | विशेष प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात 'कसबा' हा नेहमीच सत्तेचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, यंदा प्रभाग २४ मधील चित्र काहीसे वेगळे आणि रंजक वळणावर येऊन ठेपले आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर विरुद्ध रवींद्र धंगेकरांचे सुपुत्र प्रणव धंगेकर असा हा सामना असला, तरी पडद्यामागून होणारी गणिते आणि जमिनीवरचे वातावरण पाहता सध्या तरी 'धंगेकर फॅक्टर' वरचढ ठरताना दिसत आहे असा अंदाज स्थानिक नागरिक वर्तवत आहेत.

वारसा आणि विश्वासार्हतेची जोड
रवींद्र धंगेकर यांनी २०१७ मध्ये याच मतदारसंघातून बिडकरांचा पराभव केला होता. तो पराभव बिडकरांच्या जिव्हारी लागला होता. यंदा बिडकर पूर्ण ताकदीने आणि 'महापौरपदाचे भावी उमेदवार' अशा प्रतिमेसह मैदानात उतरले आहेत. मात्र, दुसरीकडे प्रणव धंगेकर यांच्या रूपाने रवींद्र धंगेकर यांनी आपली 'जनसंपर्काची शिदोरी' मैदानात उतरवली आहे. गल्लीबोळातील सामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारा 'धंगेकर पॅटर्न' हाच प्रणव यांच्यासाठी सर्वात मोठे कवच ठरत असल्याचे चित्र प्रभागात फेरफटका मारल्यावर जाणवते.
बिडकरांची 'हाय-टेक' यंत्रणा विरुद्ध धंगेकरांचा 'गावकी' बाणा
गणेश बिडकर यांची प्रचाराची यंत्रणा आधुनिक आहे. मात्र एका स्थानिक नागरिकाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, धंगेकरांनी निर्माण केलेली 'माणुसकीची नाती' बिडकरांच्या पदरचनांना छेद देताना दिसत आहेत. धंगेकर कुटुंबाने गेल्या अनेक वर्षांत जपलेला वैयक्तिक संपर्क हा केवळ राजकीय नसून तो कौटुंबिक झाला आहे, ज्याचा थेट फायदा प्रणव धंगेकर यांना मिळताना दिसत असल्याचे मत स्थानिक बोलून दाखवत आहेत.
बंडखोरीचा फटका कुणाला?
या लढतीत गणेश नवथरे यांच्या रूपाने तिसरा कोन तयार झाला असला, तरी त्याची सर्वाधिक झळ भाजपच्या परंपरागत मतांना बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
लढत अटीतटीची, पण कौल धंगेकरांकडे?
बिडकर यांच्याकडे सत्तेची ताकद आणि प्रदीर्घ अनुभव आहे, हे नाकारून चालणार नाही. ही निवडणूक त्यांच्यासाठी 'अस्तित्वाची लढाई' आहे. मात्र, कसब्याच्या गल्लीबोळात सध्या तरी "काम करणाऱ्या माणसाला साथ द्यायची" असा सूर उमटताना दिसतोय. २०१७ च्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी धंगेकर समर्थकांनी जी व्यूहरचना केली आहे, ती पाहता सध्यातरी धंगेकरांचे पारडे जड वाटत आहे.
- राजकीय विश्लेषकांचे मत: "बिडकर यांच्याकडे मोठी यंत्रणा असली, तरी धंगेकरांचा 'लोकांमधला माणूस' हा नरेटिव्ह मतदारांच्या मनात घर करून बसला आहे. जर हीच लाट मतदानापर्यंत टिकली, तर धंगेकर पुन्हा एकदा कसब्यात चमत्कार घडवू शकतात."
आता पुढे काय? १५ जानेवारीला होणारे मतदान हे पुण्यातील या दोन दिग्गजांच्या राजकीय भविष्याचा फैसला करेल. ही लढत केवळ 'धंगेकर विरुद्ध बिडकर' नसून ती 'जनसंपर्क विरुद्ध सत्ताशक्ती' अशी झाली आहे.












Click it and Unblock the Notifications