इराण-अमेरिका युद्धाचा फटका!'या' कारणामुळे पुण्यातील व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा बंद! आले आदेश
Iran us war impact pune commercial gas cylinder supply stopped : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धाच्या झळा आता थेट भारतीयांच्या स्वयंपाकघरापर्यंत आणि व्यवसायांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. युद्धाच्या वाढत्या तणावामुळे गॅस पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील चाकण आणि शिक्रापूर येथील गॅस प्लांटमधून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नेमका निर्णय काय?
'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, घरगुती वापराच्या गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि सर्वसामान्य जनतेला अडचण येऊ नये, याला प्राधान्य देत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. HPCL आणि BPCL च्या प्लांटमधून डीलर्सना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, त्यांनी सध्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरसाठी नवीन ऑर्डर्स घेऊ नयेत आणि प्लांटमध्ये गाड्याही पाठवू नयेत.
कोणत्या क्षेत्रावर होणार परिणाम?
व्यावसायिक वापराचे सिलिंडर ५, १९, ३५, ४७ आणि ४२७ किलो अशा विविध क्षमतेत उपलब्ध असतात. या निर्णयामुळे खालील क्षेत्रांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंट्स: हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
औद्योगिक क्षेत्र (Industries): धातू वितळवणे, पावडर कोटिंग आणि इतर उत्पादन प्रक्रियांसाठी लागणारा गॅस आता मर्यादित असेल.
लहान व्यवसाय: ५ आणि ७ किलोचे छोटे सिलिंडर वापरणाऱ्या लघुउद्योजकांनाही याचा फटका बसेल.
सध्याचा साठाच शेवटचा आधार
प्लांटमधून नव्या ऑर्डर्स पूर्णपणे बंद करण्यात आल्या असल्या तरी, डीलर्सकडे सध्या जो काही स्टॉक (साठा) उपलब्ध आहे, तोच हॉटेल आणि उद्योगांना वितरित केला जाईल. हा पुरवठा किती दिवस पुरेल आणि युद्धाचा हा परिणाम किती काळ टिकेल, यावर पुणे जिल्ह्यातील उद्योग विश्वाचे भवितव्य अवलंबून आहे. व्यावसायिक सिलिंडरवर सरकारचे अनुदान नसते, त्यामुळे आधीच महाग असलेल्या या गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेलमधील पदार्थांचे दर वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : इराण-इस्रायल युद्धाचा भडका! पेट्रोल-डीझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीत होणार मोठी वाढ? काय आहेत अंदाज












Click it and Unblock the Notifications