AAPचा सुपडा साफ; घरच्या मैदानावरही चारीमुंड्या चित, वाचा हरियाणात काय झालंय..
Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभेचा निकाल येण्यास सकाळपासून सुरुवात झाली. मात्र या निवडणुकीत आपचा सुपडा साफ झाल्याचे चित्र दिसत आहे. 89 जागांवर निवडणूक लढविणाऱ्या आपला या निवडणुकीत हरियाणावासियांनी साफ नाकारले. या पक्षाला आत्तापर्यंत दोन टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली आहेत. आपचे सर्वेसर्वा असलेल्या अरविंद केजरीवाल यांचे होमग्राऊंड असलेल्या हरियाणात आपचा सुपडा साफ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अरविंद केजरीवालांची जादू ओसरली
अरविंद केजरीवाल हे मुळचे हरियाणाचे आहेत. आपण भुमिपूत्र असल्याचे सांगत केजरीवाल यांनी हरियाणात प्रचार केला होता. आमच्या पाठींब्याशिवाय हरियाणात कुणीच सरकार स्थापन करु शकणार नाही, असा दावाही केजरीवाल यांनी केला होता. मात्र निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाल्यानंतर आपच्या उमेदवारांना नाकारल्याचं स्पष्ट दिसलं. शिवाय केजरीवालांची जादूही ओसरल्याचं दिसलं. जामिनावर बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्याह आपच्या अनेक नेत्यांनी हरियाणा पालथे घालत प्रचार केला होता. मात्र त्यात त्यांना अपयश आल्याचे निकालानंतर दिसले.
स्वतःच्या खासदारांनीच दिला घरचा आहेर
आपच्या या कामगिरीनंतर पक्षाच्या बंडखोर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी पक्षाच्या जखमेवर मीठ चोळले. आपच्या उमेदवारांना डिपाँझिटही वाचवता आलं नाही असं म्हणत त्यांनी केजरीवालांचं नाव न घेता टिका केली. त्या म्हणाल्या, काँग्रेसचा बदला घेण्यासाठीच ते हरियाणात लढले. माझ्यावर भाजपचा एजंट असल्याचा आरोप करणारेच भाजपचे एजंट निघाले. आज त्यांनी स्वतःच इंडिया आघाडीशी गद्दारी केली. काँग्रेसची मते पळवली. विनेश फोगटला हरविण्यासाठीही भाजपने त्यांच्या मतदारसंघात उमेदवार उभा केला होता. मालीवाल यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.
आपला दोन टक्क्यांपेक्षाही कमी मते
या निवडणुकीत आपने सुमारे 89 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यापैकी कित्येकांचं डिपाँझिट जप्त होण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत आपला दोन टक्क्यांच्या आसपास मते मिळाल्याचं सध्याच्या आकडेवारीवरुन दिसतंय. दरम्यान, आत्तापर्यंतच्या कलानुसार भाजपला मोठी आघाडी मिळाली असून भाजपचे उमेदवार 47 जागांवर पुढे आहेत. तर काँग्रेस 36 जागांवर पुढे आहे. भाजपने हीच आघाडी कायम ठेवली तर भाजप सत्तेची हॅट्ट्रीक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications