केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मारहाण; पुण्यात गज्या मारणे टोळीचा धुमाकूळ
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीने मारहाण केली. थेट केंद्रीय मंत्र्याच्या कामगाराला मारहाण झाल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. दरम्यान, जखमी कर्मचाऱ्यांशी मंत्री मोहोळ यांनी व्हिडीओ काँलवर बोलणे केले असून, त्याच्या तब्बेतीची चौकशी केली. पोलिसांनी मारणे टोळीतील तिघांना अटक केल्याचे सांगितले जाते.

नेमके काय घडले?
कुख्यात गुंड गज्या मारणेची टोळीचा चारचाकी गाड्यांचा ताफा पुण्यातून जात होता. त्यावेळी हाँर्न वाजविण्याच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. केंद्रीय कर्मचारी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचे काम सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याला मारणे टोळीने बेदम मारहाण केली. त्याच्या नाकावर व इतर ठिकाणी गंभीर मारहाण झाल्याची माहिती आहे. या जखमी कर्मचाऱ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गज्या मारणेचा भाचा फरार
पोलिसांनी तत्काळ या प्रकरणात पावले ऊचलली. घटना घडल्यानंतर पोलिसांनी मारणे टोळीची धरपकड सुरु केली. मारहाण करणारे आरोपी हे काही दिवसांपूर्वीच जामीनावर सुटले असल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून, या मारहाणीत असणार गज्या मारणेचा भाचा मात्र अद्याप फरार आहे. पोलिस त्याचाही शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
मंत्री मोहोळांनी केली चौकशी
या प्रकारानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तत्काळ आपल्या कर्मचाऱ्याची चौकशी केली. रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कर्मचाऱ्याशी त्यांनी व्हिडीओ काँलद्वारे संपर्क साधल्याचे सांगितले जाते. पुण्यातील गुंडगिरी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी एक ट्रॅफिक पोलिसाला मारहाण करण्याची घटना घडली होती. आता या गुंडांनी थेट मंत्र्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.












Click it and Unblock the Notifications