गोदावरी एक्सप्रेसमधील गणेशोत्सवाची 27 वर्षांची परंपरा खंडित; चाकरमान्या भाविकांची नाराजी
राज्यभरात आजपासून गणेशोत्सवास प्रारंभ झाला असून अनेक गणपती मंडळांत, घराघरांत लाडक्या गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत होत आहे. तर दुसरीकडे गणेशोत्सवासंदर्भातील एक निराशाजनक बातमी समोर आली आहे.
धावत्या गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सवाची 27 वर्षांची परंपरा यंदा खंडित झाली आहे. धावत्या रेल्वेत गणेश मूर्ती स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केल्याने नियमित प्रवास करणाऱ्या भाविकांमध्ये यंदा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. गोदावरी एक्स्प्रेसमध्ये यंदा गणेश मूर्तीची स्थापना न झाल्याने सर्वधर्मीय चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यंदा 'गोदावरीचा राजा' चे दर्शन होणार नाही.

27 वर्षांची परंपरा खंडित
'गोदावरीचा राजा' अशी मनमाड -मुंबई या गोदावरी एक्स्प्रेसमध्ये प्रतिष्ठापना होणाऱ्या गणपतीची ओळख आहे. मात्र, यावर्षी प्रवाशी संघटनेने प्रयत्न करूनही धावत्या रेल्वेत गणेश स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केल्याने धावत्या रेल्वेतील बाप्पांचा प्रवास थांबणार आहे. गेल्या 27 वर्षांची परंपरा यंदा खंडित झाल्याने गणेशभक्त आणि चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'गोदावरीच्या राजा'ला यंदा ब्रेक
मनमाड, लासलगाव आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील चाकरमाने हे गेल्या 27 वर्षांपासून मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेसच्या धावत्या प्रवासी रेल्वे गाडीच्या पासबोगीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची स्थापना करून दहा दिवस पूजा-आरती करण्यात येत होती. यंदा मात्र या परंपरेला रेल्वे प्रशासनाने ब्रेक लावला आहे.
नाशिकची बाजारपेठ फुलली
गणरायाच्या स्वागतासाठी नाशिकसह राज्यभरात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. मुहूर्तावर गणरायाची स्थापना करण्यासाठी भक्तांची कालपासूनच लगबग सुरू आहे. बाजारपेठेत भक्तांची गणेशमूर्ती पसंत करण्याबरोबरच सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत भक्तांची मोठी गर्दी शहराच्या विविध भागात होती. आज सकाळपासून लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी नाशिककरांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणाही पुरेशी काळजी घेत असून, तगडा बंदोबस्त या काळात राहणार आहे. गणेश स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत बंदोबस्त तैनात राहणार आहे.












Click it and Unblock the Notifications