लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला दुर्दैवी गालबोट: दोन चिमुकल्यांना चिरडले, एकाचा जागीच मृत्यू
Lalbaugcha Raja Visarjan Accident : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्साहानंतर बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात राज्यभरात विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या होत्या. मुंबईतही लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा उत्साह होता, मात्र याच उत्साहाला एका भीषण अपघाताने दुर्दैवी गालबोट लागले.

लालबाग राजाजवळ दोन चिमुकल्यांना चिरडले
शनिवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक भीषण अपघात घडला. एका अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोन मुलांना चिरडले. या अपघातात २ वर्षांची चिमुकली चंद्रा वजणदार हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचा ११ वर्षांचा भाऊ शैलू वजणदार गंभीर जखमी झाला. शैलूवर सध्या परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
विजर्सनानंतर बाप्पाला निरोप
या दुर्दैवी घटनेनंतरही लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पुढे सुरू राहिली. लालबाग मार्केट, चिंचपोकळी स्टेशन आणि भायखळ्यातील हिंदुस्तान मशिदीच्या जवळून जात अखेर पहाटे गिरगाव चौपाटीवर 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत बाप्पाला निरोप देण्यात आला.
मात्र, मिरवणुकीच्या उत्साहावर या दुर्दैवी घटनेची छाया पडली. या घटनेमुळे उत्सवाच्या आनंदाला दु:खाची झालर लागली असून, निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलतेचे गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.












Click it and Unblock the Notifications