उमेदवारांची घोषणा करण्यात वंचितची 'आघाडी'; 11 उमेदवारांचे नावं जाहीर, तृतीयपंथीय शमिभा पाटीलला संधी
VBA Candidate List : आगामी विधानसभा निवडणूक कधीही लागू शकते. त्याअनुषंगाने राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. वंचितने राज्यातील 11 जागांवर उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे. तर रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यास अद्याप कालावधी आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने सर्वात आधी पुढाकार घेतला. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या 11 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व उमेदवार विदर्भ-मराठवाडा विभागातील आहेत.

उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून घेतला निर्णय
प्रकाश आंबेडकर म्हणाले, वेगवेगळ्या ओबीसी संघटना आणि त्याचबरोबर आदिवासी समुहातील राजकीय पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरवण्याचे ठरवले आहे. या आघाडीला अजून आम्ही नाव दिलेलं नाही, पुढे नाव देणार आहोत. काही जणांशी आम्ही बोलतोय, सोबतच काही संघटनांशी बोलतोय . लोकसभा निवडणुकीत आम्ही पाहिलं आहे, पैशाचा महापूर होता. आता महापुराचा महापूर येईल विधानसभेत असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर करत असल्याचे आंबेडकर म्हणाले.
कोण आहेत शमिभा
श्याम मीना भानुदास पाटील यांनी आता शमिभा हे नाव धारण केलं आहे. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच, वंचित बहुजन आघाडीच्या सक्रीय पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. राज्यातील तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आणि मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी वयाच्या 30 व्या वर्षी लैंगिक ओळख सार्वजनिक केली होती.
त्यानंतर, जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीय समुदायाला एकत्र करण्याचं काम त्यांनी त्यांनी केलं असून आजही ते सुरू आहे. तृतीयपंथीयांचे शिक्षणाचे प्रमाण केवळ 0.3 टक्के आहे, त्यामुळे, तृतीयपंथीयांच्या शिक्षण हक्कासाठी त्या लढत आहेत. महाविद्यालयीन नाटकांमध्येही शमिभा यांनी स्त्री पात्राची भारदस्त भूमिका साकारल्या होत्या. शमिभा या सामाजिक कार्यात अग्रेसर असतानाही शिक्षणाप्रती अतिशय संवेदनशील आहेत. म्हणूनच पीएचडीसारखी सर्वात मोठी पदवी मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे साहित्य हा विषय घेऊन त्या पीएचडी करत आहेत.
उमेदवारांची नावे मतदारसंघनिहाय
रावेर - शमिभा पाटील
सिंधखेड राजा - सविता मुंडे
वाशीम - मेघा डोंगरे
धामगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
नागपूर साऊथ वेस्ट - विनय भांगे
डॉ. आविनाश नन्हे - साकोली
फारुख अहमद - दक्षिन नन्हे
शिवा नरांगळे -लोहा
विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद (संभाजीनगर)
किसन चव्हाण - शेवगाव
संग्राम माने - खानापूर












Click it and Unblock the Notifications