केसरकर, सावंत, सत्तारांना डच्चू..! वाचा शिवसेनेच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी
नागपूरात आज महायुतीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. तो आज पूर्ण झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिदे गटाच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली. या नावात दीपक केसरकर, तानाजी सावंत व अब्दुल सत्तार या दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला.

शिंदेंच्या मंत्रीमंडळात दिग्गजांना धक्का
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच फूट पडली. त्यावेळी अखंड शिवसेनेतील एक मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत आला होता. शिवसेनेतून उठाव केल्यानंतर ही विधानसभेची पहिलीच निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे 57 उमेदवार विजयी झाले. शिंदेसोबत असणारे अनेक दिग्गज गेल्यावेळी मंत्रीमंडळात होते. मात्र यावेळी दीपक केसरकर, तानाजी सावंत व अब्दुल सत्तार या माजी मंत्र्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. नव्या मंत्रिमंडळातून या तिघांचाही पत्ता कट झाला आहे.
शिंदे गटाने कुणाला दिली संधी
शिवसेनेच्या ११ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. त्यात अनेक नावे कायम दिसली. गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची तर आशीष जैस्वाल आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
शिरसाट, गोगावलेंना संधी
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर त्यांच्यासोबत संजय शिरसाट, भरत गोगावले देखील होते. ते देखील गेल्यावेळी मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र गेल्या वेळी त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही. यावेळी मात्र यावेळी शिंदेंनी तीन माजी मंत्र्यांचा पत्ता कट करत नव्या तीन जणांना संधी दिली. शिरसाट व गोगावले हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जात होते. त्यामुळे त्यांची गेल्यावेळीही चांगलीच चर्चा झाली होती.












Click it and Unblock the Notifications