'जय गुजरात'चा नारा जाणूनबुजून की विचारपूर्वक? एकनाथ शिंदेंनी नारा देऊन नेमकं काय साधलं?
राज्यात सध्या मराठी-हिंदी भाषिक वाद पुन्हा एकदा तापत असताना, पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "जय महाराष्ट्र, जय गुजरात" अशी घोषणा करत नवा चर्चेचा विषय निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शेजारी उपस्थित होते.

ही घोषणा शिंदेंनी पुण्यातील जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर च्या उद्घाटनप्रसंगी केली. गुजराती समाजाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात अमित शाह आणि शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदेंनी "जय महाराष्ट्र, जय गुजरात" अशी घोषणा दिली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटू लागले आहेत.
शिंदेंचा अमित शाह यांना सलाम - 'डबल इंजिन' सरकारची आठवण
आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी 2022 मधील सत्तांतराची आठवण करून दिली. "त्या काळात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यासाठी अमित शाह यांचे रणनीतीमूलक नेतृत्व महत्त्वाचे ठरले. त्यांनी आव्हानांना संधीमध्ये बदलण्याची कला दाखवली," असे सांगत शिंदेंनी त्यांची भरभरून स्तुती केली.
"तेव्हा महाराष्ट्रात सामान्य जनतेसाठी कार्य करणारे सरकार आणणे गरजेचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन तर होतेच, पण अमित शाह माझ्यासाठी डोंगरासारखे ठामपणे उभे होते," असेही त्यांनी नमूद केले.
"अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत" - शिंदेंचा मजेशीर उल्लेख
शिंदे यांनी आपल्या भाषणात अमित शाह यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचाही उल्लेख करत वातावरण हलकंफुलकं केलं. "अमित शाह हे मूळचे गुजराती असले तरी, त्यांची पत्नी कोल्हापूरची असल्याने ते महाराष्ट्राचे जावई ठरतात. त्यांच्या घरात मराठी आणि गुजराती संस्कृती एकत्र नांदतात," असे ते म्हणाले.
शिंदेंनी शाह यांच्या कार्यप्रभावाची स्तुती करत खास उर्दू शेरही सादर केला:
"आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है,
दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है,
आपके आनेसे यहाँ की हवा का नूर बदल जाता है,
आपके नाम से हर शख्स अदब से झुक जाता है."
या शेरने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर भाषणाचा समारोप करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी "जय महाराष्ट्र, जय गुजरात" अशी जोरदार घोषणा दिली.
नवीन वादाची शक्यता?
राज्यात सध्या भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर असताना, शिंदेंनी दिलेल्या 'जय गुजरात' घोषणेमुळे विरोधक काय भूमिका घेतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications