Eknath Khadse : जळगावात खळबळ! एकनाथ खडसेंच्या बंगल्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एवढे सोने अन् रोकड लंपास
Eknath Khadse House Theft jalgaon : जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे. शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या 'मुक्ताई' बंगल्यात चोरी झाली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडाही पडला होता.

बंद बंगला, चोरांनी डाव साधला!
एकनाथ खडसे यांचा बंगला जळगावात असून ते सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने, त्यांचा जळगावातील बंगला बंद होता. नेमकी हीच संधी साधून चोरानी डाव साधला आणि दागिने आणि रोख रकमेची चोरी झाली. आज सकाळी खडसे यांचे कर्मचारी बंगल्याची नियमित पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच कर्मचाऱ्याने तत्काळ एकनाथ खडसे यांना कळवले. खडसे यांनी त्वरित पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
एकनाथ खडसे यांची संतप्त प्रतिक्रिया
चोरीच्या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका केली आहे. ते म्हणाले, "रात्री घरफोडी झाली आहे. बंगल्यातील सर्व खोल्यांची कुलुपे तोडून चोरी करण्यात आली आहे. माझ्या रूममधून ₹३५ हजार रुपये रोख आणि पाच-पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या चोरीला गेल्या आहेत. खाली राहणाऱ्या आमच्या नातेवाईकांचे सुमारे पाच तोळे सोने चोरीला गेले आहे. घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन ही चोरी झाली आहे."
"पोलिसांचा धाक उरलेला नाही!"- खडसे
बंगल्या चोरी झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी याबाबत प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे आणि दोन नंबरचे धंदे वाढल्याचे सांगत पोलिसांवर टीका केली. ते म्हणाले, "पोलिसांचा जळगाव जिल्ह्यात धाक उरलेला नाही. घटनेचे गांभीर्य पोलीस आणि सरकारला नाहीय."
काही दिवसांपूर्वीच दरोड्याची घटना
विशेष म्हणजे, ९ ऑक्टोबरच्या रात्री केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपासह वरणगाव परिसरातील एकूण तीन पंपांवर सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते. या घटनांमध्ये आरोपींनी रोख रक्कम आणि इतर साहित्य मिळून सुमारे १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या दरोड्याच्या घटनेनंतर काहीच दिवसांत एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. जळगाव पोलीस या दोन्ही प्रकरणांचा कसून तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications