CM शिंदे, फडणवीस, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांचं शिक्षण किती?वाचा
Education of Eknath Shinde Devendra Fadnavis Sharad Pawar : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटलं तर महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली, अशा शब्दांत शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळं आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या शिक्षणाचा प्रवास.
नेतेमंडळींनी राजकारणात कशी झेप घेतली, कसा त्यांचा शिक्षणाचा प्रवास राहिला, याचा आढावा घेऊया. चला तर मग सुरुवात करूया.

एकनाथ शिंदे यांचे शिक्षण
आपल्याला सर्वांना परिचित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शैक्षणिक प्रवास थोडा वेगळा आहे. तरुण वयातच घराची जबाबदारी आणि राजकारणात सक्रिय झाल्यामुळे त्यांचे शिक्षण अकरावीपर्यंतच झाले. मात्र, शिकण्याची जिद्द कधीच कमी झाली नाही.
2014 मध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि मराठी आणि राजकारण या विषयांत पदवी मिळवली. विशेष म्हणजे, शिक्षणाबद्दलची त्यांची आस्था त्यांच्या कुटुंबातही दिसून येते. त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर बनवलं श्रीकांत यांनी एम. एस. (ऑर्थो.) हे शिक्षण पूर्ण केलंय.
देवेंद्र फडणवीस यांचे शिक्षण
आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कुशल नेते तर आहेतच, पण शिक्षणाच्या बाबतीतही त्यांचा लौकिक आहे. त्यांनी नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळवलीय. एवढंच नव्हे तर त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्येही पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. त्यानंतर त्यांनी जर्मनीतील डीएसई बर्लिन येथून डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा विशेष डिप्लोमा केलाय. हे सर्व पाहता, फडणवीस यांचे शिक्षण त्यांना राजकारणातच नव्हे तर प्रशासनातही वरचढ बनवते.
शरद पवार यांचे शिक्षण
महाराष्ट्राच्या राजकारणातील खंदे नेतृत्व शरद पवार यांचा शैक्षणिक प्रवास फार साधा वाटू शकतो. पण, ज्या काळात दहावी झाले की हमखास शिक्षकाची नोकरी लागत होती, त्याकाळी शरद पवार पदवीधर होते. विशेष म्हणजे पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व्यक्ती तालुक्यातील मोजक्याच असत. शरद पवार यांचं शालेय शिक्षण बारामतीच्या सरकारी शाळेतून झालं, तर पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात झालेली वक्तृत्व स्पर्धा, तिथं विकसित झालेले नेतृत्व गुण यामुळंच ते इतक्या उंचीवर पोहोचले आहेत.
अजित पवार यांचे शिक्षण
अजित पवार हे राजकारणातील एक महत्त्वाचे नाव आहे. मात्र, त्यांचे शिक्षण त्यांना तितकं पुढं घेऊन गेलं नाही. बारावी नंतर त्यांनी बी. कॉम.ला प्रवेश घेतला होता, पण त्यांच्या वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. ते बारावी पासच सांगतात, कारण पदवीचं शेवटचं वर्ष पूर्ण होऊ शकलं नाही. कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेतली आणि पुढे ते काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात स्थिरावले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शिक्षण
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू राजकारणात जितके नावाजलेले आहेत, तितकेच कला क्षेत्रातही आहेत. उद्धव ठाकरे एक उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत तर राज ठाकरे एक कुशल व्यंगचित्रकार. दोघांनीही कलेच्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलंय. त्यामुळे त्यांच्या राजकारणात कलात्मकतेची झलकही आपल्याला पाहायला मिळते.
प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांचं बालपण मुंबईत गेलं. वांद्र्यातील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. मुंबईच्याच सिद्धार्थ कॉलेजमधून त्यांनी पदवी आणि वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. प्रकाश आंबेडकर हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असले तरी शालेय जीवनात त्यांचं बालपण इतर सामान्य मुलांसारखंच होतं.
प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, याबाबत त्यांच्या शाळेतील क्वचितच दोन ते तीन जणांनाच माहिती होती. प्रकाश आंबेडकरांनीही इतर मुलांप्रमाणे सामान्य आयुष्य जगावं, अशी शाळेच्या मुख्याध्यापकांची इच्छा होती. इतर मुलांप्रमाणे मुक्तपणे वावरता यावं म्हणून त्यांची ओळख लपवण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला होता.












Click it and Unblock the Notifications