'सोन्याचा चमचा' ते 'राजपुत्र-राजकन्या'! शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाहीचा उदय;8 वारसांना रणांगणात संधी
MLAs MPs children candidature : "आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत, लोकशाहीत सामान्य कार्यकर्ता नेता झाला पाहिजे," असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर वारंवार टीका केली. मात्र, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाने जाहीर केलेली उमेदवारी यादी पाहता, त्यांच्या पक्षातही 'घराणेशाही'चे मोठे पीक आल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुंबईतील तब्बल ८ महत्त्वाच्या जागांवर आमदार आणि खासदारांच्याच वारसांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

भाजपचा 'सावध' पवित्रा; तरीही नार्वेकरांना झुकते माप
नांदेडमधील लोहा नगरपालिकेत एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट दिल्याने भाजपवर प्रचंड टीका झाली होती. त्या नामुष्कीतून धडा घेत भाजपने यावेळी 'नेत्यांच्या मुलांना तिकीट नाही' असे धोरण अवलंबले आहे. मात्र, याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कुटुंब अपवाद ठरले आहे. नार्वेकरांच्या कुटुंबात भाजपने तीन उमेदवाऱ्या दिल्या असून, इतरत्र मात्र पक्षाने सावध पवित्रा घेतला आहे.
"सामान्य कार्यकर्ता कुठे?" : निष्ठावंतांचा सवाल
शिंदे गटात फूट पडली तेव्हा "आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत, इथे सामान्य कार्यकर्ता मोठा होईल," असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, उमेदवारी वाटपात पुन्हा एकदा 'नेत्यांच्या वारसांना' प्राधान्य मिळाल्याने जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुसफूस आहे.
"आम्ही सतरंजी उचलायची आणि पदे मात्र नेत्यांच्या मुलांना मिळणार असतील, तर आमच्या संघर्षाला काय अर्थ?" असा संतप्त सवाल काही इच्छुकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित केला आहे.
प्रचाराची धार बोथट होणार?
एकनाथ शिंदे हे सातत्याने उद्धव ठाकरेंवर "सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले" म्हणून टीका करतात. मात्र, आता स्वतःच्याच पक्षातील ८ 'राजपुत्रांना' आणि 'राजकन्यांना' रिंगणात उतरवल्यामुळे त्यांच्या टीकेतील धार बोथट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईच्या या रणांगणात आता 'घराणेशाही' विरुद्ध 'सर्वसामान्य कार्यकर्ता' हा वाद निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
शिंदेंच्या शिवसेनेतील 'वारसदार' उमेदवार
ज्या 'घराणेशाही'वरून राजकारण तापले होते, त्याच घराणेशाहीला शिंदे गटाने मुंबईत प्रतिष्ठा दिली आहे. यामध्ये आमदार-खासदारांच्या कन्या, पुत्र, पत्नी आणि सुनांचा मोठा भरणा आहे:
- मतदारसंघ/वॉर्ड क्र. : उमेदवार : नाते
- वॉर्ड १९१ : प्रिया गुरव-सरवणकर : माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या
- वॉर्ड ७३ : दिप्ती वायकर : खासदार रवींद्र वायकर यांची कन्या
- वॉर्ड १६९ : जय कुडाळकर : आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा
- वॉर्ड ११३ : रूपेश अशोक पाटील : आमदार अशोक पाटील यांचा मुलगा
- वॉर्ड १६३ : शैला लांडे : आमदार दिलीप मामा लांडे यांची पत्नी
- वॉर्ड १५३ : तन्वी काते : आमदार तुकाराम काते यांची सून
- वॉर्ड १४६ : समृद्धी गणेश काते : आमदार तुकाराम काते यांची सून
- वॉर्ड १८३ : वैशाली नयन शेवाळे : माजी खासदार राहुल शेवाळे यांची भावजय












Click it and Unblock the Notifications