नागपूर-बंगळुरू हादरले! हुंड्याची हाव अन् संसार उद्ध्वस्त:लग्नानंतर काही दिवसांत पती-पत्नीचा शेवट!
Dowry Harassment Tragedy : "लग्न" म्हणजे दोन जीवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन मानले जाते. मात्र, जेव्हा या पवित्र नात्यात 'हुंडा' नावाचा राक्षस प्रवेश करतो, तेव्हा त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात, याचा प्रत्यय नागपूर आणि बंगळुरूमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने दिला आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या जोडप्याचा हुंड्याच्या वादातून दुर्दैवी अंत झाला असून, ४० लाखांच्या मागणीने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाची राखरांगोळी केली आहे.

हनिमूनवरून सुरू झाला वादाचा प्रवास!
२९ ऑक्टोबर २०२५ रोजी सूरज आणि गानवी ऊर्फ राशी (२६) यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. सूरज एका खाजगी कंपनीत कार्यरत होता. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या गानवीला लग्नानंतर काही दिवसांतच वास्तवाचे चटके बसू लागले. सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या स्वागत समारंभासाठी ४० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी लावून धरली.
हृदयद्रावक बाब म्हणजे, हे जोडपे जेव्हा श्रीलंकेला हनिमूनसाठी गेले होते, तिथेही गानवीचा छळ थांबला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तिथेही पैशांवरून झालेल्या वादा मुळे गानवी हनिमून अर्धवट सोडून आपल्या माहेरी परतली होती.
बंगळुरूमध्ये पत्नीची आत्महत्या अन् जनक्षोभ
माहेरी परतल्यानंतर मानसिक तणावाखाली असलेल्या गानवीने बुधवार, २४ डिसेंबरच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान २६ डिसेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.
गानवीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांचा संयम सुटला. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी गानवीचा मृतदेह थेट पती सूरजच्या घरासमोर नेऊन निदर्शने केली. बंगळुरूच्या विद्यारण्यपुरा पोलिसांनी हस्तक्षेप करत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. राममूर्तीनगर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात पतीचा मृत्यू, सासू गंभीर
पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच अटकेच्या भीतीने सूरज आणि त्याची आई जयंती बंगळुरूहून नागपुरात आले. वर्धा रोडवरील 'हॉटेल रोयाल वीला' येथे त्यांनी मुक्काम ठोकला.
मात्र, नैराश्य आणि पश्चात्तापाने ग्रासलेल्या माय-लेकांनी तिथेही टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेत सूरजचा मृत्यू झाला असून, त्याची आई जयंती यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. एका बाजूला हुंडाबळी गेलेली सून आणि दुसऱ्या बाजूला मुलाचा मृत्यू व आईची मृत्यूशी झुंज, अशा परिस्थितीत हे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.












Click it and Unblock the Notifications