दिशा सालियन वडिलांच्या अफेअरमुळे होती त्रस्त-क्लोजर रिपोर्ट; पोलिसांवर ब्लेम करत वकीलाचा मोठा दावा
Disha Salian Death Case : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा आला आहे. दिशा आपल्या वडिलांच्या अफेअरमुळे त्रस्त झाली होती. संबंधितांना पैसे देऊन ती पुरती थकली होती. यामुळे आलेल्या आर्थिक वैफल्यातून तिने स्वतःचे आयुष्य संपवून घेतले, असे मालवणी पोलिसांच्या यापूर्वीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. यावर आता दिशाचे वडील सतिश सालियन यांच्या वकीलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत मोठा खुलासा देखील केला आहे.
एकीकडे दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. तर आता मालवणी पोलिसांनी यापूर्वी दाखल केलेल्या आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये वरील नवी माहिती उजेडात आली आहे.

मालवणी पोलिसांच्या रिपोर्टमध्ये नेमके काय?
- दिशा सालियनने 8 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मालवणी पोलिसांनी तपास करुन एक अहवाल सादर केला होता. त्यात दिशाचे काही प्रोजेक्ट्स अयशस्वी झाले होते, मित्रांशी खटके उडाले होते, अशा कारणांचा उल्लेख होता.
- याशिवाय महत्त्वाचे म्हणजे दिशाच्या वडिलांनीच लेकीने कष्टाने कमावलेले पैसे आपल्या ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यावर उधळल्याचेही यात नमूद आहे.
- दिशाने ही गोष्ट तिच्या काही मैत्रिणींना आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाही सांगितली होती. 2 जून 20202 रोजी दिशाने यासंबंधी आपल्या वडिलांना जाब विचारला आणि त्यानंतर ती तिचा होणारा नवरा रोहन रॉय याच्या जनकल्याण नगरमधील फ्लॅटवर राहायला गेली.
- दिशाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यानंतर त्यांनी दिशाने आत्महत्या केल्याचा अंतिम निष्कर्ष काढला.
- 4 फेब्रुवारी 2021 रोजी हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. सतीश सालियन यांनी आता पुन्हा याचिका दाखल करून काही बड्या असामींवर आरोप केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
दिशाच्या वडिलांनी मुंबई सीपींची घेतली होती भेट
दुसरीकडे, दिशा सालियनच्या वडिलांनी आपल्या वकिलांसह नुकतीच मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मुलीच्या कथित हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करत या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा त्यांचा आरोप आहे. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांचा ड्रगजच्या व्यापारात हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
आरोपींमध्ये कुणाकुणाचा सहभाग?
- सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी आता क्लोजर रिपोर्टवर पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आम्ही आमची तक्रार मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे दिली आहे. त्यांनी सीपींशी चर्चा करून आमची तक्रार दाखल करून घेतली आहे. आता आरोपींना केव्हा अटक करणार? याची जबाबदारी पोलिसांवर आहे.
- आरोपींमध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सुरज पंचोली, त्यांचे अंगरक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे. परमबीर सिंह यांनी हे प्रकरण दाबण्याच्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आहेत. परमबीर यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर कव्हरअप करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली होती. पण मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबापर्यंत सर्वच गोष्टी त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करतात.
नेमकं काय म्हणाले निलेश ओझा?
दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते, ती त्यांना पैसे द्यायची, त्यातून ती निराश होती. हे सारं मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये लिहिल्याचा दावा केला जात आहे. मात्र जर तो रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतला आहे, तर मग तो वैध कसा? त्यातील गोष्टींना काही अर्थच उरत नाही, त्यानंतर एसआयटीची स्थापना झाली आणि नव्यानं तपास सुरू झाला आहे. त्यामुळे या रिपोर्टचा काहीही फायदा होणार नाही, मालवणी पोलिसांनी किती खोटे पुरावे तयार केलेत यासाठी त्यांना नोबल पुरस्कार मिळायला हवा,' असं सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications