Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काय आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील 'ते' प्रकरण? घटना, आरोप, कारवाई, आदेश, समजून घ्या 8 मुद्यांत

गर्भवती महिलेच्या उपचारासाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आगावू पैशाची मागणी केली. परंतु एवढे पैसे नसल्याने रुग्णालयाने उपचारास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयाने आगावू पैशाची मागणी केल्यामुळेच आपल्या पत्नीचा मृ्त्यू झाल्याचा आरोप पती सुशांत भिसे यांनी केला. मृत्यू झालेली तनिषा भिसे ही गर्भवती होती. विशेष म्हणजे तक्रारदार सुशांत भिसे हे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे पीए आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण चांगलेच गाजले. हे प्रकरण नेमके काय आहे तेच आपण पाहू...

death of pregnant woman in Pune  Tanisha

१. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे ही गर्भवती महिला दाखल झाली. रुग्णालयाने पेशंटला दाखल करण्यापूर्वी २० लाख रुपयांची मागणी केली. परंतु एवढे पैसे नसल्याने रुग्णालयाने तनिषा यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यानंतर तनिषाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिने रस्त्यातच दोन मुलांना जन्म दिला व त्यातच तिचा मृत्यू झाला.

२. रुग्णालयाने आगावू २० लाख रुपयांची मागणी केली व वेळेत उपचार न केल्यामुळेच आपल्या पत्नीचा मृत्यू झाला असा आरोप पिडीतेचे पती सुशांत भिसे यांनी केला. सुशांत भिसे हे विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांचे पीए असल्याने या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले.

३.आ. अमित गोरखे यांनी या प्रकरणात उडी घेऊन रुग्णालयावर गंभीर आरोप केले. आपण या प्रकरणात आरोग्य मंत्रालयाच्या ओएसडीशी बोललो. मात्र तरीही रुग्णालयाने पेशंटला अॅडमीट करुन घेतले नाही. दुसरे रुग्णालय शोधण्यात वेळ गेला म्हणून पेशंटचा मृत्यू झाला, असा आरोप आ. गोरखे यांनी केला. आपण हे प्रकरण विधानसभेच्या अधिवेशनात मांडणार आहे, असे आ. गोरखे यांनी सांगितले.

४. या गदारोळानंतर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी आरोपांना उत्तर दिले. माध्यमांमध्ये दिली जाणारी माहिती अपूर्ण आहे. त्यामुळे रुग्णालयाची प्रतिमा खराब होत आहे. आम्ही अंतर्गत चौकशी अहवाल तयार करत असून तो राज्य सरकारला पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

५. या संपूर्ण प्रकरणानंतर आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

६. या घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. या आंदोलनात रुग्णालय कर्मचाऱ्यांवर पैसेही फेकण्यात आले. त्यानंतर वातावरण तापले.

७. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल, असे अजित पवार यांनी सांगितले.

८. महाराष्ट्रामध्ये २० लाख रूपये सामान्य माणूस देऊ शकतो का? माझ्याकडे सगळी माहिती आहे, फडणवीसांच्या तोंडावर माहिती फेकू शकतो. आम्ही बोललो की मिरच्या झोंबतात, तुमची लेव्हल जरा खाली आणा, गौतम अदानी, अंबानी यांचा हा महाराष्ट्र आहे. भिसे या लोकांनी तुम्हाला मतं दिलीत. देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर ज्या डॉक्टरांची भिसे कुटुंब नावे घेईन त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+