Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार; निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्र्यांनी शड्डू ठोकला!

Devendra Fadanvis on NCP Pune Manpa News : राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि महायुती पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळवून शहरांचा विकास करेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या तयारीसंदर्भात, युती आणि विरोधी पक्षांच्या संभाव्य हालचालींवर त्यांनी सविस्तर भाष्य केले.

Devendra Fadanvis on NCP Pune Manpa News

विकासावर आधारित 'कौल' पुन्हा भाजपलाच!

निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले. स्थानिक स्वराज्य संस्था दीर्घकाळ निर्वाचित प्रतिनिधींशिवाय प्रशासकांच्या भरवशावर चालणे लोकशाहीसाठी योग्य नव्हते, असे मत त्यांनी व्यक्त केले. "आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेले काम पाहता पुन्हा कौल आमच्या बाजूने येईल आणि जनता शहर विकासाची संधी आम्हाला देईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने

महायुती या निवडणुका एकत्र लढणार की स्वबळावर, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी युतीबाबतचा निर्णय स्पष्ट केला. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती होईल. काही ठिकाणी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी युती होईल. एखाद-दोन ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील.

पुणे: मैत्रीपूर्ण लढत

पुण्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने पुण्याचा चांगला विकास केला असल्याने, पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने लढताना दिसतील. मात्र, ही लढत 'मैत्रीपूर्ण' असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आरक्षण आणि मतदार याद्यांचा घोळ

नागपूर-चंद्रपूर आरक्षण: नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेत ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण झाले आहे. या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असली तरी, त्यांचा निकाल अंतिम निर्णयाच्या अधीन राहील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

मतदार याद्या: मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, हे मान्य करत त्यांनी सांगितले की, "मतदार याद्यांमध्ये घोळ आहे म्हणून निवडणुकाच घ्यायच्या नाहीत, असे होऊ शकत नाही." एसआयआर (SIR) मुळे हा घोळ कमी होईल. निवडणूक आयोगाने याद्या 'ब्लॉक चेन'मध्ये टाकाव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.

भाजपमध्ये इनकमिंग: नेतृत्वाचा निर्णय अंतिम

भाजपमध्ये अनेक नेत्यांचे प्रवेश सुरू असल्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांमध्ये पक्षात येण्याची ओढ आहे. परंतु, कोणाला घ्यायचे याचा निर्णय पक्ष अध्यक्ष आणि प्रमुख नेते घेतील. यासोबतच, "आमचे आणि शिंदे साहेबांचे ठरले आहे की एकमेकांचे (पदाधिकारी/नेते) घ्यायचे नाहीत," अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.

ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही!

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. "दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी काही फटका बसणार नाही, दोन्ही ठाकरे आणि कॉंग्रेस एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. मुंबईकर आमच्या भाजपला आणि महायुतीलाच निवडून देतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचे हित महायुतीने जपले आहे, ज्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील, असे त्यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाणांच्या भाकीतावर टोला

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या 'मराठी माणूस पंतप्रधान बनेल' या भाकीतावर मुख्यमंत्र्यांनी खोचक टोला लगावला. "पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा ज्येष्ठ नेता, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागले तर, तर मात्र निश्चितपणे यात काही तरी काळं बेरं आहे," असे ते मिश्किलपणे म्हणाले. चव्हाण यांनी स्वतःला त्रास करून न घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

निवडणुकीचे वेळापत्रक

  • उमेदवारी अर्ज दाखल करणे: २३ ते ३० डिसेंबर
  • अर्जांची छाननी: ३१ डिसेंबर
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: २ जानेवारी २०२६
  • अंतिम उमेदवारी यादी व चिन्ह वाटप: ३ जानेवारी २०२६
  • मतदान: १५ जानेवारी २०२६
  • मतमोजणी व निकाल: १६ जानेवारी २०२६
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+