"काही लोकांच्या मनावर बुरशी चढली!" भाजपच्या या बड्या नेत्याचा विरोधकांवर हल्लाबोल!
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या खरे खोटेपणाबाबत विरोधक कांगावा करीत आहेत. कांगावा करणाऱ्या या लोकांच्या मनावर बुरशी चढली, अशी जळजळीत टीका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनच्या संग्रहालयातून साताऱ्यात वाघनखं आणण्यात आली. यानंतर आज साताऱ्यात प्रदर्शन सोहळा पार पडला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

यापेक्षा मोठे भाग्य नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफझल खानाचा वध केला, ती वाघनखं आपल्या महाराष्ट्रात आली. ती साताऱ्यात दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे, यापेक्षा मोठं भाग्य कुठलंही असू शकत नाही.
नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला, तो प्रसंग आपण अनेक पिढ्यांपासून ऐकत आलो आहे. यासाठी शिवरायांनी ज्या शस्त्राचा वापर केला, ती वाघनखं आपल्या महाराष्ट्रात आली असून साताऱ्यात दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यापेक्षा मोठं भाग्य कुठलंही असू शकत नाही. या वाघनखांच्या माध्यमांतून प्रत्यक्ष शिवरायांच्या इतिहासाशी जुडण्याची संधी आपल्याला मिळाली आहे", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
काय म्हणाले अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. काही चांगले होत असेल तर काही जण त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. टीका करणाऱ्यांपैकी अनेक जण लंडनमध्ये कोहिनुर हिरा पाहतात फोटो काढून टाकतात. मात्र आज महाराष्ट्रात मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ही वाघनखे आणण्यात आली आहेत असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

हा चुनावी जुमला नाही - अजित पवार
अजित पवार म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकासाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु, चुनावी जुमला म्हणून विरोधक त्यावर टिका करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, आम्ही या योजना तुमच्या पर्यंत पोचवणारच. योजना पुढे कायम चालू रहायच्या असतील तर, विधानसभेत पुन्हा महायुतीचे सरकार आणावे लागेल. आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या सर्व'उमेदवारांना मताधिक्यांने निवडून द्या. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
महायुतीचा रोड शो
यावेळी ओपन जीपमधून शिंदे, फडणवीस आणि पवार संग्रहालयाकडे पोहोचले. महायुतीचे मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. तसेच शिवभक्तांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. ओपन जीपमधून जात असताना मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सातारकरांचे अभिवादन स्वीकारत महायुतीचा रोड शो पार पडला.












Click it and Unblock the Notifications